आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नकोशी मानसिकता:स्त्री भ्रूणहत्येचा संशय; तज्ज्ञांच्या अहवालानंतर होणार गुन्हा नोंद

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गर्भपातावेळीच महिलेचा मृत्यू; सीएसने घेतली कलेक्टर, एसपींची भेट

गर्भवती महिलेचा रक्तस्राव होऊन मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली होती. या प्रकरणात गर्भलिंगनिदान करून अवैध गर्भपात करताना मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी वैद्यकीय निष्काळजीपणाबाबत जिल्हा रुग्णालयाकडून अहवाल मागवला आहे. तो प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणात गुन्हा नोंद केला जाणार आहे. सोमवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांची भेट घेत चर्चा केली.

शीतल गणेश गाडे (३०, रा. बकरवाडी, ता. बीड) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या चार महिन्यांच्या गर्भवती होत्या. रविवारी दुपारी रक्तस्राव होऊ लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. या खासगी रुग्णालयाने गंभीर स्थिती पाहून त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवले होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. शीतल यांना पहिल्या तीन मुली असून चौथ्या वेळी त्या गर्भवती होत्या. शवविच्छेदन अहवालानुसार, त्यांचा गर्भपात करण्यात आला.

या वेळी गर्भाशयाला इजा होऊन अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. मात्र, शवविच्छेदन अहवाल गुन्हा नोंद करण्यास पुरेसा नसल्याने पोलिसांनी जिल्हा रुग्णालयाला पत्र पाठवून मेडिकल निग्लिजन्सी कमिटीचा अहवाल मागवला आहे. त्यांच्या अहवालाआधारे गुन्हा नोंद केला जाणार आहे. या प्रकरणात आता आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या रडारवर हे गर्भलिंगनिदान करणारे रॅकेट आहे.

सरकारी रुग्णालयाने दिला होता नकार
दरम्यान, शीतल यांनी तीन दिवसांपूर्वीच जिल्हा रुग्णालयात गर्भपात करण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र, डॉक्टरांनी त्यांना यास नकार दिला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. शीतल यांचा गर्भ १६ आठवड्यांपेक्षा जास्तीचा म्हणजेच चार महिन्यांपेक्षा जास्तीचा होता, अशी शंका आहे. सरकारी रुग्णालयाच्या नकारानंतर त्यांनी घरी किंवा खासगी रुग्णालयात गर्भपाताचा प्रयत्न केला असावा, अशी शंका आरोग्य विभागाला आहे.

४ दिवसांपूर्वी आरोग्य विभागाकडे नोंद
शीतल गाडे या ऊसतोड कामगार आहेत. ६ नोव्हेंबर २०२१ रोजी त्या सातारा जिल्ह्यातील एका साखर कारखान्यावर ऊसतोडीसाठी गेल्या होत्या. १० मे २०२२ रोजी त्या ऊसतोडीहून परत आल्या. त्या वेळी त्या गर्भवती होत्या. १ जून रोजी आशा कार्यकर्तीने गरोदर माता म्हणून त्यांची एमसीटीएस प्रणालीत नोंद केली.

‘त्या’ रुग्णालयाचे फुटेज ताब्यात
सोमवारी सायंकाळी पोलिस उपअधीक्षक संतोष वाळके यांनी पिंपळनेरचे पोलिस उपनिरीक्षक एम. एन. ढाकणे यांच्यासह शीतल यांना सुरुवातीला ज्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते, त्या रुग्णालयाला भेट दिली. त्यांना कधी दाखल केले व कधी जिल्हा रुग्णालयात रेफर केले याबाबत चौकशी करून त्यांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले.

गुन्हा नोंद करून तपास करू
या प्रकरणात वैद्यकीय निष्काळजीपणाबाबत अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात येईल व त्यानंतर सखोल तपास केला जाईल. जिल्हा रुग्णालयाच्या समितीकडून याबाबत अहवाल मागवला असून तो प्राप्त होताच गुन्हा नोंद केला जाईल. सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद पिंपळनेर पोलिसांत केली आहे.
- पंकज देशमुख, पोलिस अधीक्षक, बीड

गर्भाशयाला गंभीर इजा
शीतल गाडे यांच्या गर्भाशयाला गंभीर इजा होऊन रक्तस्राव झाला. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजक होऊन मृत्यू झाला आहे. गर्भपाताचा हा प्रयत्न गर्भलिंगनिदानातून झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांची भेट घेत माहिती दिली व गुन्हा नोंद करून तपासाची मागणी केली आहे.
- डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

बातम्या आणखी आहेत...