आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिलांकडे मोठ्या प्रमाणात कौशल्ये असतात. मात्र, त्या कौशल्यांचा अनेकदा वापर होत नाही. त्यामुळे आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचा वापर करत महिलांनी रोजगारक्षम होण्याची गरज आहे. या माध्यमातून कुटुंबांचा आर्थिक गाडा आणखी पुढे नेता येणे शक्य आहे, असे प्रतिपादन स्वरूप ब्यूटी पार्लरच्या संचालिका अर्चना बोरा यांनी केले.
माजलगाव येथे सादिया बहुद्देशीय सेवाभावी संस्था व स्वरूप ब्यूटी पार्लर यांच्या वतीने स्वयंरोजगार योजनेंतर्गत मुलींना मोफत ब्यूटी पार्लरचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी गुरूवारी (ता.३१ मार्च) बोरा या बोलत होत्या. याप्रसंगी प्रशिक्षणार्थींना मोफत साहित्याचे वाटप करण्यात आले. सादिया बहुउदेशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा नसरीन शेख व अर्चना बोरा यांच्या हस्ते हे साहित्य वितरित करण्यात आले. याप्रसंगी बोलताना अर्चना बोरा यांनी सांगितले की, महिला व मुलींना अगदी नाममात्र दरात हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण दोन महिने चालणार असून प्रशिक्षण संपल्यावरदेखील मोठ्या प्रमाणात भेटवस्तू देण्यात येणार आहेत. या प्रशिक्षणाचा उद्देश हा महिलांनी मुख्य प्रवाहात यावे, हा आहे. एकदा महिलांना रोजगार मिळवता आला की त्या स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ शकतात. यातून कुटुंबाला अार्थिक हातभार लागू शकतो. शिवाय भविष्यात प्रगतीच्या नव्या संधीही खुल्या होऊ शकतात. त्यामुळे ज्यांच्याकडे ज्या संधी आहेत, त्यांनी त्यांचा वापर करत रोजगार क्षम व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. यावेळी युवती, महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उपस्थित मुलींनीही प्रशिक्षणात सहभागी होत आपणही रोजगार निर्मितीसाठी पुढाकार घेणार असल्याची ग्वाही दिली. उपस्थितांचे आभार नसरीन शेख यांनी मानले.
शिक्षणातून प्रगतीचे मार्ग खुले होत असतात
शिक्षण व रोजगार यातून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात प्रगतीचे मार्ग हे खुले होत असतात. त्यामुळे आजच्या तरुणींनी अधिकाधिक कौशल्ये आत्मसात करण्याची गरज आहे. जेव्हा आपण स्वत: रोजगारक्षम होऊ तेव्हा निश्चित यश मिळवण्यास पात्र होऊ शकतो, असेही सादिया बहुद्देशीय संस्थेच्या संचालिका नसरीन शेख यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.