आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:शिवसेना उपजिल्हाप्रमुखांवर तलवारीने प्राणघातक हल्ला; पक्ष पदाधिकारी बैठकीत सत्ताधाऱ्यांविरोधात केले होते वक्तव्य

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंत्री संदिपान भुमरे यांच्या आढावा बैठकीत पक्षातील पदाधिकारी आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वक्तव्य करून चर्चेत आलेले शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हनुमंत जगताप यांच्यावर सोमवारी दुपारी घोडका राजुरीजवळ प्राणघातक हल्ला करण्यात आला. तलवारीने हल्ला करून आपल्याला तलावात फेकण्याचा प्रयत्न केल्याचा आराेप जगताप यांनी केला. दरम्यान, या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

सोमवारी सकाळी हनुमंत जगताप हे सदाशिव सानप यांच्यासह दुचाकीवरून आपल्या भवानवाडी या गावावरून बीडकडे येत होते. घोडका राजुरी तलावाजवळ त्यांच्या दुचाकीच्या मागून पाच ते सहा दुचाकींवरून ८ ते १० तरुण आले. त्यांनी जगताप यांची दुचाकी अडवून त्यांच्यावर हल्ला केला. जगताप यांच्या म्हणण्यानुसार हल्लेखोरांकडे तलवार होती. त्यांनी तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र सानप यांनी तो राेखल्याने जीव वाचला. मात्र, आपल्याला बेदम मारहाण करून अंगावरील चेन, काही अंगठ्या हल्लेखोरांनी काढून घेतल्या. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनेनंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे व ज्येष्ठ नेते बदामराव पंडित यांनी जिल्हा रुग्णालयात येऊन जगताप यांची भेट घेतली. मात्र, उशिरा आल्याने त्यांना जगताप यांच्या कुटुंबीयांच्या रोषाचा सामना करावा लागला.

दुचाकी विनाक्रमांकाच्या
हल्लेखोर विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून आले होते. हल्ला कुणी केला हे सांगता येणार नाही. पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांच्या व सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बाेललो होतो. - हनुमंत जगताप, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना.

सर्व बाजूंनी तपास
जगताप यांच्या जबाबानंतर गुन्हा नोंद होईल. हल्लेखोरांचा शोध सुरू केला गेला. - बाळासाहेब आघाव, एपीआय, पिंपळनेर.

हल्लेखोर राष्ट्रवादीचे
या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्र्यांना कळवली जाईल. चंद्रकांत खैरंेसह जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेणार आहे. हा हल्ला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. - कुंडलिक खांडे, जिल्हाप्रमुख, शिवसेना.

बातम्या आणखी आहेत...