आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:राजकारणामध्ये विश्वबंधुत्वाची भूमिका घ्यावी; अंबाजोगाईत आयोजित व्याख्यानात परिमल माया सुधाकर यांनी विचार मांडले

अंबाजोगाई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक राजकारणात भारताने विश्वगुरू होण्यापेक्षा विश्वबंधुत्वला महत्त्व द्यावे, राजकारणाच्या पलीकडे जाऊन देशाच्या स्थैर्याचा, प्रगतीचा विचार करावा, असे प्रतिपादन पुणे येथील विचारवंत डॉ. परिमल माया सुधाकर यांनी केले. येथील श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या कर्मचारी गणेश व्याख्यानमालेत ‘बदलते जागतिक राजकारण व परराष्ट्र धोरण’ या विषयावर त्यांनी आपली भूमिका मांडली.

भारताच्या परराष्ट्र धोरणासमोर अनेक आव्हाने आहेत अनिश्चिततेची स्थिती जागतिक राजकारणात दिसून येत आहे. सोव्हिएत युनियनचा पाडाव झाल्यानंतर जागतिकीकरणाला सुरुवात झाली, पण ही अवस्था फार काळ टिकली नाही. राष्ट्र राज्याची संकल्पना पुन्हा जोर धरू लागली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. भारताने गुट निरपेक्ष आंदोलनाला बळ देवून स्वत:चा विकास साधण्याचा प्रयत्न केला, पण शेजारील राष्ट्रांशी संबंध सुधारले नाहीत. पाकिस्तान, चीन बरोबरचे संबंध सामान्य झाल्याशिवाय देशाला प्रगती साधता येणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. भारत विश्वबंधुत्वाचा आग्रह धरून जागतिक स्तरावर महत्त्वाची भूमिका वठवू शकतो, असे मत डॉ. परिमल माया सुधाकर यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रा. एन. के. गोळेगावकर यांनी भूषवले. सूत्रसंचालन नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. संपदा कुलकर्णी यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. रमेश सोनवळकर यांनी करून दिला. या कार्यक्रमाला योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे, उपाध्यक्ष अॅड. शिवाजीराव कऱ्हाड, कोषाध्यक्ष प्रा. माणिकराव लोमटे, सहसचिव डॉ. साहेबराव गाठाळ, प्रा. एस. के . जोगदंड, प्रा. भिमाशंकर शेटे, डॉ. शैलेश वैद्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. थारकर, प्राचार्य आर. डी. जोशी, प्राचार्य डाॅ. रमण देशपांडे, योगेश्वरी नूतन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पाठक, पत्रकार, नागरिक, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...