आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतीचा जोडधंदा म्हणजे पशुपालन. हा व्यवसाय करत असताना पशुधनाची योग्य वेळी योग्य काळजी घेतली तर उत्पन्नात निश्चितपणे वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या बाबीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. रंजित शेजूळ यांनी केले.
बीड जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने कामधेनू दत्तक ग्राम योजना राबवण्यात येत आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन, पशू आहार व दुग्धव्यवसायाबद्दल माहिती देण्यासह मिनरल मिक्सचरचे वाटप, जंतनाशकाचे वाटप करण्यात येत आहे. माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी येथे हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी पशुधन विकास अधिकारी डॉ. रंजित शेजूळ हे बोलत होते. डॉ. पवार, डॉ. डोंगरे, मोठेवाडीचे सरपंच अविनाश गोंडे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना डॉ. शेजूळ म्हणाले, कामधेनू दत्तक ग्राम योजना राज्यातील विविध जिल्हा परिषदांमार्फत चालवली जाते.
पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे हा योजनेचा उद्देश आहे. गाई व म्हशींच्या दूध उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ व्हावी यासाठी कामधेनू दत्तक ग्राम योजना ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याचे शासनाने निश्चित केले आहे. या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेकडील पशुवैद्यकीय संस्थांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येकी एक गाव दत्तक घेण्यात येतेय. संबंधित गावामध्ये योजनाबद्धरीत्या पशुसंवर्धकविषयक कार्य मोहिमा हाती घेण्यात येतात. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शेतकरी बांधव हजर होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.