आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधारूर तालुका सीताफळासाठी प्रसिद्ध आहे. बालाघाटाच्या डोंगरात नैसर्गिकरीत्या मोठ्या प्रमाणात सीताफळाची झाडे उगतात. परंतु आता शेतकऱ्यांनी आपल्या शेतातच सीताफळाची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील चोरंबा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रामचंद्र तोंडे यांनी आपल्या सोनिमोहा येथील शेतामध्ये सीताफळाची लागवड केली. सुटीच्या दिवसांत त्यांनी पाणी, खते देण्याचे काम करत ही बाग फुलवली आहे. त्यांच्या या उपक्रमातून परिसरातील इतर शेतकरीही सीताफळ लागवडीकडे वळले आहेत. धारूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बालाघाटाचा डोंगर आहे. या डोंगरांमध्ये नैसर्गिकरीत्या मोठ्या प्रमाणात सीताफळाची झाडे आहेत. सीताफळाच्या झाडांना सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बहार येतो.
परंतु नैसर्गिकरीत्या उगवलेल्या सीताफळांपासूनची चवही न्यारी असली तरी त्यांचा आकार हा लहान मोठ्या स्वरूपाचा होत आहे. यावर पर्याय म्हणून तालुक्यात इतर पीक घेण्याऐवजी शेतकऱ्यांनी आता कमी खर्चात तसेच कमी पाण्यावर मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळणारे सीताफळ पीक म्हणून आपल्या शेतामध्येच लागवड करण्यास सुरुवात केली आहे. सीताफळ लागवड केल्यामुळे पीकही जोमात येत आहेत. या परिसरामध्ये सीताफळांना पोषकही वातावरण आहे. पारंपरिक पिके घेण्यास मजूर तसेच वेळ मिळत नसल्यामुळे मोठ्या अडचणी उभ्या राहतात. तसेच उत्पादनही भरपूर मिळत नसल्याने त्यांनी अगदी कमी खर्चात अनेक वर्षे उत्पादने मिळणारे पीक म्हणून आपल्या सोनिमोहा येथील शेतामध्ये दीड एकर क्षेत्रावर सीताफळ लागवड करण्यात आली आहे.
दोन वर्षांपूर्वी सुपर गोल्डन जातीची ७०० रोपे त्यांनी लावली. सध्याही झाडे पाच ते सहा फूट उंचीची झाली असून या झाडांना फळे लागण्यास सुरुवात झाली आहे. सध्या खत भरणे व पाणी देणे या व्यतिरिक्त या झाडांना कसल्याही प्रकारचा खर्च येत नाही. शाळा भरण्यापूर्वी सकाळी, सायंकाळी तसेच सुटीच्या दिवशी शिक्षक तोंडे आपला वेळ सीताफळाच्या बागेत घालवतात. याचबरोबर त्यांनी डाळिंबाची बागही लावली आहे. यावर्षीपासून त्यांनी सीताफळाचे पीक घेण्यास सुरुवात केली असून येत्या सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात त्यांना मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळण्याची आशा आहे. त्यांनी लागवड केलेली बाग पाहून याच गावात दहा ते बारा शेतकऱ्यांनी सीताफळाच्या बागा उभ्या केल्या आहेत.
कमी खर्चातील पीक
सध्या मजुरांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. पारंपरिक पिके घेण्यास मजुरांची आवश्यकता आहे. मजूर मिळत नसल्यामुळे त्यावर पर्याय म्हणून मी माझ्या दीड एकर शेतामध्ये सीताफळाची बाग लावली आहे. माझा रिकामा वेळ मी शेतामध्ये देतो. सीताफळ पिकातून मोठे उत्पादन मिळण्याची आशा आहे.
- रामचंद्र तोंडे, शिक्षक, चोरंबा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.