आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गती वाढणार:​​​​​​​लसीकरणाच्या नोंदणीची जबाबदारी शिक्षकांवर; 100 कुटुंबांमागे एक शिक्षकाची होणार नियुक्ती; सीईओ अजित कुंभार यांचे आदेश

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 45 वर्षांपुढील व्यक्तींची शिक्षण विभाग करणार नोंदणी
  • लसीकरणाची गती वाढवण्याचे प्रयत्न

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढवण्यासाठी आता जिल्हा परिषद शिक्षकांची मदत घेणार आहे. ग्रामीण भागातील १०० कुटुंबांमागे एक शिक्षक ऑनलाइन नोंदणीसाठी नियुक्त केला जाणार आहे.४५ वर्षांवरील नागरिकांची इझी अॅपवर नोंद करून टाेकन क्रमांक शिक्षक मिळवून देतील. यासाठीचे आदेश जि.प.चे सीईओ अजित कुंभार यांनी काढले. जिल्ह्यात लसीकरण गतीने होण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येताहेत. सध्या १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरण बंद असल्याने ४५ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण केले जात आहे. कोविन अॅपवरून नोंदणीसाठी स्लॉट बुकिंगसाठी केवळ २०० नागरिकांची मर्यादा एका केंद्रावर आहे.

स्लॉट ओपन होताच काही मिनिटांतच बुकिंग फुल्ल होत असल्याने नागरिकांची ओरड होत होती. तर स्पॉट बुकिंगसाठी लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी आलेले नागरिक, बुकिंग किंवा टोकन मिळवण्यासाठी, ऑफलाइन रजिस्टरवर नोंदणीसाठी आलेले नागरिक अशी मोठी गर्दी होत होती. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्यात अडचणी येते. बुकिंगसाठी येत असलेल्या अडचणी पाहता यावर पर्याय म्हणून बीडच्या आरोग्य विभागाने कोविन ऐवजी इझी अॅप व निडली अॅपवरून लसीकरणासाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली होती. यात स्लॉट ऐवजी टोकन क्रमांक देऊन त्यानुसार लस उपलब्धतेप्रमाणे नागरिकांना मेसेज पाठवून लसीकरणासाठी बोलावले जात होते.

यामुळे लसीकरणाच्या कार्यक्रमात थाेडा सुरळीतपणा आलाे. मात्र, ग्रामीण भागातील ४५ वर्षांवरील व ज्येष्ठांना ऑनलाइन नोंदणीसाठी अडचणी येत आहेत. अनेकांकडे अँड्रॉइड मोबाइल नाही, असला तरी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत त्यांना अडचणी येतात. ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणींबाबतही पर्याय शोधला गेला. यासाठी शिक्षण विभागाची मदत घेतली जाणार आहे.

शिक्षक तीन जूनपासून करणार काम
जिल्ह्यात ३ जूनपासून शिक्षकांमार्फत लसीकरणासाठी इझी अॅपवर नोंदणीचे प्रत्यक्ष काम सुरू हाेणार आहे. गट शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांना व कुटुंब वाटप करायचे आहे. रोज अहवाल सादर करून माहिती आरोग्य विभागाने दिलेल्या गुगल शीटमध्ये भरायची आहे. - अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. बीड

नियंत्रणासाठी अधिकारी ठेवतील लक्ष
शिक्षकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यवेक्षीय अधिकारी म्हणून मुख्याध्यापकांवर जबाबदारी असेल. तर, केंद्रप्रमुख हे केंद्रस्तरीय पर्यवेक्षण अधिकारी असतील. विस्तार अधिकाऱ्यांवर तालुकास्तरावरील जबाबदारी असेल. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सर्वांवर नियंत्रण ठेवून अहवाल द्यायचा आहे तर प्राथमिक शिक्षणाधिकारी हे जिल्हास्तरावरील संनियंत्रण अधिकारी असतील.

२ जून रोजी ऑनलाइन प्रशिक्षण देणार
इझी अॅप आणि निडली अॅपवर नोंदणी प्रक्रिया कशी करायची, याबाबत गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांना मास्टर ट्रेनर म्हणून येत्या २ जून रोजी सकाळी १० वाजता ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाईल. त्यांनी त्याच दिवशी दुपारी २ वाजता शिक्षकांना हे प्रशिक्षण द्यायचे आहे.

शिक्षक असे करणार काम
प्रत्येक १०० कुटुंबामागे एक शिक्षक नेमला जाईल. हा शिक्षक त्या १०० कुटुंबांतील ४५ वर्षांवरील सर्वांची लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करून त्यांना टोकन क्रमांक मिळवून देईल. ज्या गावात शिक्षक नसेल तिथे शेजारच्या गावातील शिक्षकाची नियुक्ती केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...