आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ऐन कोरोनाकाळात घोड्यावर नवरदेवाचा साज चढवत, वाजतगाजत गुरुवारी सकाळी पाटोद्याच्या तहसील कार्यालयात वरात आली अन् साऱ्यांची लगबग सुरू झाली. कुणाचे लग्न आले हे कुणालाच कळेना. घोड्यावर नवरोबा विराजमान, मागे घोषणा देणारे फेटा घातलेले वऱ्हाडी, बँडबाजाही... पण नवरी काही दिसेना. चांगला तास-दोन तास हा गोंधळ चालला अन् हा गांधीगिरी आंदोलनाचा प्रकार असल्याचे लक्षात आल्यावर साऱ्यांमध्ये हशा पिकला. नवरदेवाचे कौतुक तर झालेच, पण ज्या कारणासाठी हा सारा अट्टहास करावा लागला ते कामही झाले. नवरदेवाची वरात आल्यापावली परतली अन् तहसील प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला.
पाटोदा तालुक्यातील धनगरजवळका येथील अमित घनश्याम आगे हा युवक उच्चशिक्षित आहे. मात्र, नोकरी नसल्याने बेरोजगारीची कुऱ्हाड त्याच्यावर कोसळलेली. स्वतंत्र शिधापत्रिका मिळावी म्हणून अमित २९ सप्टेंबर २०२० पासून पाटोदा कार्यालयाचे उंबरठे झिजवतोय. मात्र, एक व्यक्ती कुटुंबाच्या व्याख्येत बसत नसल्याने आणि नियमांमुळे त्याला शिधापत्रिका काही मिळत नव्हती. त्याचा अर्ज निकाली काढला होता. शेवटी अमितने शक्कल लढवली व गुरुवारी नवरदेवाचा साज चढवत, घोड्यावर वाजतगाजत चक्क वरातच तहसीलमध्ये आणली. एकतर शिधापत्रिका द्या, नाहीतर एखादी मुलगी पाहून माझे लग्न लावत ‘कुटुंबा’ची व्याख्या तरी पूर्ण करा, अशी अजब मागणी त्याने केली. इतक्यावरच न थांबता त्याने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने कार्यालयासमोर ठिय्याही दिला. मुलगी कुठून देणार? या बुचकळ्यात पडलेल्या प्रशासनाने अखेर अमितला शिधापत्रिका दिली. या आंदोलनात वऱ्हाडी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक अरुण जाधव, पंचायत समिती सदस्य यशवंत खंडागळे, गोरख झेंड, सचिन मेघडंबर, विठ्ठल नाईकवाडे, रमेश वरभुवन, सुनील जावळे, विठ्ठल पवळ, अतुल आगे सहभागी झाले होते.
दोन महिन्यांच्या प्रयत्नांना यश
दोन महिन्यांपासून मी विनंत्या केल्या, पण काही उपयोग न झाल्याने मला असे आंदोलन करावे लागले. लग्न तर लागले नाही, पण आज मला रेशन कार्ड मिळाल्याचा आनंद आहे.- अमित आगे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.