आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढच्या वर्षी लवकर या:बीड शहरात दहा तास चालल्या मानाच्या मिरवणुका; गणपती बाप्पांवर पुष्पवृष्टी

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुलालाची उधळण, गणपती बाप्पा माेरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष, ढोल पथकाबरोबरच डीजेचाही ठेका आणि बेभान विसरून नाचणारे गणेशभक्त अशा वातावरणात शुक्रवारी दहा दिवसांनंतर जिल्ह्यात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर प्रथमच मोठा उत्साह विसर्जन मिरवणुकांध्ये होता. शहरातील मिरवणुका तब्बल दहा तास चालल्या. सन २०१९ च्या तुलनेत अधिक वेळ या मिरवणुका चालल्या. दरम्यान, जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार, वाद अथवा दुर्घटना न घडता विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पडल्या असून ध्वनी प्रदूषणाचा एकही गुन्हा जिल्ह्यात नोंदवला गेला नाही.

कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा प्रथमच कुठल्याही निर्बंधांशिवाय गणेशोत्सव पार पडला. सुरुवातीपासूनच गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. जिल्ह्यात दीड हजार सार्वजनिक मंडळांनी गणेश स्थापना केली होती. देखावे, सामाजिक उपक्रमांमुळे गणेशोत्सवाला रंगत होती. दहा दिवस विविध उपक्रम मंडळांनी राबवले. बीड शहरात दुपारी १ वाजेपासून मानाच्या गणपतीच्या मिरवणुकांना सुरुवात झाली होती. पोलिसांचा मोठा फौजफाटा विसर्जन मार्गावर तैनात हाेता. हजारोंच्या संख्येने भाविक या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. चौकाचौकात ढोल पथक, झांज पथक, हलगी पथक आणि डीजे लावून भाविक बाप्पासमोर नाचत होते. भाविकांकडून स्वागत केले जात होते. शहरातील कनकालेश्वर मंदिराजवळील विहिरीत गणपतीचे विसर्जन केले. रात्री १२ वाजेपर्यंत मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुका सुरू होत्या.

पोलिसांनीही धरला ठेका
विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तात पोलिसांनीही बाप्पा समोर ताल धरला. तर, शिवाजीनगर, बीड ग्रामीण ठाण्यातील बाप्पाचे सकाळी विसर्जन करण्यात आले. यावेळीही ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी बाप्पासमोर नाचून उत्साहात विसर्जन केले आणि मग बंदोबस्तावर तैनात झाले.

घरगुती गणेशाचेही विसर्जन
शहरातील सर्व मंडळांबरोबरच घरगुती गणपतीचेही कनकालेश्वर कुंड, कर्परा नदी, बिंदुसरा नदी, पाली येथील प्रकल्पात नागरिकांकडून विसर्जन करण्यात येत होते. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत यामध्ये नागरिक सहभागी झाले होते.

एसपींसह यंत्रणा उतरली रस्त्यावर
विसर्जन मिरवणुका शांततेत, शिस्तीत व्हाव्यात यासाठी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक संतोष वाळके हे रस्त्यावर उतरले होते. त्यांच्यासह ठाणेप्रमुख, कर्मचारी, एसआरपी, आरसीपी, क्यूआरटी पथके, होमगार्ड असा दोन हजार पोलिसांचा फौजफाटा जिल्ह्यात तैनात होता.

बातम्या आणखी आहेत...