आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील नेकनूर येथील संत मदर तेरेसा इंग्लिश स्कूल बंद असून शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश मिळालेल्या ९ विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. या नऊ विद्यार्थ्यांचे अन्य ठिकाणच्या शाळेत समायोजन करावे, अशी मागणी पालकांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मागील वर्षी बीड शहरातील शाहूनगर भागातील संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल संस्थाचालकांनी अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शाळेतील पालकांना आपल्या मुलांना शिक्षण कसे द्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान, शाळेतील आरटीईअंतर्गत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे इतर शाळेत समायोजन केले होते. तर, यंदा शिक्षण विभागाची परवानगी न घेता नेकनूर येथील संत मदर तेरेसा शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे या शाळेतील प्रवेशित विद्यार्थी आणि पालकांना इतरत्र फिरण्याची वेळ आली आहे. शिक्षण विभागाने आमच्या मुलांचे इतर शाळेत समायोजन करावे आणि काेणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देत शाळा बंद करण्याचा निर्णय घेणाऱ्या शाळा प्रशासनावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मंगळवारी पालकांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी, सीईओ आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे. आमच्या मुलांचे इतर इंग्लिश स्कूलमध्ये समायोजन करून हक्काचे शिक्षण द्यावे, अन्यथा १ जुलै रोजी शिक्षण विभागासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा पालकांनी दिला.
संस्थाचालकाकडून अनामत रक्कम घ्यावी
नेकनूर येथील इंग्लिश स्कूल बंद करून शिक्षण हक्क कायद्याचा भंग करत विद्यार्थ्यांना सक्तीच्या शिक्षणापासून वंचित ठेवले. शासनाने शाळा मान्यतेवेळी संस्थाचालकांकडून १० लाख रुपये इतकी अनामत रक्कम ठेवून घ्यावी. जिल्हा शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेकडून एक शपथपत्र लिहून घ्यावे. त्यामुळे कुणीही शाळा बंद करणार नाही.
-मनोज जाधव, आरटीआय कार्यकर्ते, बीड.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.