आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:बिनविरोध सरपंच निवडीची 65 वर्षांची परंपरा होणार खंडित ; तीन वॉर्डांतून निवडले जाणार सात सदस्य

शिरुर कासार9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१९५७ मध्ये फुलसांगवी-हाजीपुर या संलग्नग्रामपंचायतची स्थापना झाली त्यावेळी दोन्ही गावांनी एकत्र येऊन अविरोध ग्रामपंचायत निवडणूक घेतली. फुलसांगवी गावाला सरपंच पद तर हाजीपुर गावाला उपसरपंच पदाचा सन्मान देऊन पहिली निवडणूक बिनविरोध पार पडली. ही परंपरा पुढे हाजीपुर गावान सांभाळून तब्बल ६५ वर्ष ग्रामपंचायत निवडणूक टाळून बिनविरोध सरपंच निवडीची परंपरा जोपासली आहे. यंदा मात्र गावात निवडणूक होण्याची चिन्हे आहेत.

१९६४ साली हाजीपुर गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात आली. निवडणुका झाल्या की गावातील हेवेदावे भांडण तंटे मोठ्या प्रमाणावर वाढत असून संबंधातील नागरिकात दुरावा निर्माण होण्याचे प्रकार केवळ निवडणुकांनीच वाढत असल्याची बाब हाजीपुर ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने गावाची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध काढण्याची परंपरा नागरिकांनी जोपासली आहे. परंतु ६५ वर्षाच्या या परंपरेला आता खंड पडण्याची परिस्थिती गावात निर्माण झाली आहे. युवकांची राजकारणात वाढणारा प्रभाव या बिनविरोध निवडीला कारणीभूत ठरणारा असून युवकांच्या प्रतिष्ठेसाठी ६५ वर्षानंतर प्रथमच नागरिक मतदान करणार आहे.

खेडकर, उगले पहिले मानकरी : दोन गावांनी एकत्र येऊन सलग्न ग्रामपंचायतच्या माध्यमातून निवडणूक अविरोध करून प्रथम सरपंच पदावर किसन त्र्यंबकराव खेडकर यांची तर उपसरपंच पदी उत्तम बाबाजी उगले हे विराजमान झाले होते दोघांनी गाव गाड्यांचा कारभार अत्यंत सुलभ व सुरळीत चालवल्याने अविरोध निवडीची परंपरा ६५ वर्ष सुरू राहिली.

तीन वॉर्ड, ७ सदस्य : संपूर्ण ग्रामपंचायत मध्ये एकूण तीन वार्ड असून याच्या माध्यमातून ७ ग्रामपंचायत सदस्य निवडले जाणार आहेत. थेट जनतेतून सरपंच निवडले जाणार आहे. ग्रामपंचायत मध्ये एकूण ५४९ मतदार असून गावची लोकसंख्या ११०० च्या जवळ आहे.

विकासासाठी बिनविरोध
निवडणुकांमध्ये सहसा दोन गट प्रबळ असतात व या माध्यमातून घराघरातील नागरिक दोन गटात विभागले जातात यामुळे वाद, तंटा, विकोप वाढत राहून गावातील समस्या सुटण्यासाठी अडथळे निर्माण होतात या घटना टाळता याव्यात या हेतूने गावातील प्रतिष्ठित निवडणूक अविरोध करत होते.

अजूनही प्रयत्न सुरू
६५ वर्षापासून गावात अविरोध सरपंच निवडीची परंपरा असून या पंचवार्षिक मध्ये ही परंपरा अखंडित सुरू राहावी या हेतूने प्रतिष्ठित नागरिक सरपंच निवडणुका टाळण्याच्या प्रयत् करत आहेत. निवडणूक दरम्यान यात यश प्राप्त होते की नाही हे लवकरच कळेल.

बातम्या आणखी आहेत...