आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:जगण्याचा ‘कोळसा’ अन् आयुष्याची ‘राख’!; वडगावकरांच्या अन्न-पाण्यात राख, आंदोलने-उपोषणांचा शून्य परिणाम

परळीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हवेतील धूलिकणांचे प्रमाण 2 पीपीएमपेक्षा जास्त

“वाऱ्याची एखादी मंद झुळूक इतरांसाठी शीतल वगैरे असेल पण आमच्यासाठी ही झुळूक वैताग आणणारी ठरते; कारण, या झुळकीने तुम्ही जेवत असाल तर तुमच्या ताटातही राख येऊन पडेल. हातातला घास टाकून तुम्हाला दुसरे ताट वाढून घ्यावे लागेल. नाहीतर, जेवणाआधी घराची दारे, खिडक्या बंद कराव्या लागतील तरच तुम्ही जेऊ शकता. राखेने आमच्या जगण्याचा “कोळसा’ अन् आयुष्याची “राख’ झाली आहे. परळी तालुक्यातील वडगावचे माजी सरपंच शिवाजी शिंदे उद्विग्नपणे सांगत होते...

परळी तालुक्यातील पाच हजार लोकवस्तीचे दादाहरी वडगाव. औष्णिक विद्युत केंद्राच्या जवळ असलेले हे गाव सध्या राखेच्या प्रदूषणाचा सामना करत आहे. औष्णिक विद्युत केंद्रातून बाहेर पडलेल्या राखेचे साठवणीचे तळे, परिसरातील वीटभट्ट्या आणि काही शेतमालकांनी शेतात साठवलेले राखेचे ढिगारे वडगावकरांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. चारही बाजूंनी गाव राखेच्या वेढ्यात सापडल्याची स्थिती आहे. या विरोधात आंदोलने, उपोषणे करूनही यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. गावचे माजी सरपंच शिवाजी शिंदे सांगतात, औष्णिक विद्युत केंद्राच्या राखेमुळे आमचे जगणे कठीण झाले आहे. ५ वर्षांपूर्वी या राखेला कुणी हातही लावत नसे. पावसाळ्यापूर्वी येणारे वादळी वारे व वावटळीने तळ्यातील राख उडून गावभर पसरत होती. याबाबत तक्रारी केल्यानंतर औष्णिक विद्युत केंद्राने या परिसरात बऱ्यापैकी वृक्षारोपण केले.

हा परिसर हिरवागार झाला त्यामुळे मध्यंतरी राखेचा त्रास काहीसा कमी झाला. परंतु, गेल्या तीन वर्षांत वर्षात वीटभट्टीसाठी राख वापरली जाऊ लागली अन् राखेच्या अर्थकारणाला वेग आला. सर्व झाडे तोडून राख पुन्हा उघडी केली गेली. टिप्पर, ट्रॅक्टरद्वारे राखेची वाहतूक होऊ लागली. राखेमुळे एखाद्या साथ रोगासारखे दुष्परिणामांना सोबत घेऊन जगावे लागत आहे. दरम्यान, औष्णिक विद्युत केंद्र प्रशासानाने दाऊतपूर व वडगाव येथील राखेच्या तळ्यात ३ लाख वृक्षलागवड करून जोपासना केली होती. या घनदाट वनराईस फिनिक्स हे नाव दिले होते. वीज निर्मिती केंद्रास १९९५ मध्ये वनश्री हा पुरस्कार फिनिक्सला मिळाला होता. या तीन लाख झाडांची कत्तल करून राख उपसा सुरू आहे.

हवेतील धूलिकणांचे प्रमाण २ पीपीएमपेक्षा जास्त

  • परळी व परिसरातील राखेच्या प्रदूषणामुळे हवेतील धुलिकणांचे प्रमाण २ पीपीएमपेक्षा जास्त
  • हवेतील दृश्यमानता कमी तर झालेली आहे. शिवाय फुप्फुसाचे व त्वचेच्या गंभीर आजारांचा सामना करावा लागतो
  • येथे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, हवेतील गुणवत्ता मोजणारी यंत्रणा बसवणे गरजेचे

सहा महिन्यांत ९ वेळा कारवाई
परळी ग्रामीण पोलिसांकडून १८ जानेवारी ते २१ जून या सहा महिन्यांच्या कालावधीत ९ वेळा राखेची वाहतूक करणारे टिप्पर व राख उपसणाऱ्या जेसीबी अशा ३७६ वाहनांविरुद्ध तक्रारी दाखल आहेत.

तीन संचांतून १८०० मे. टन राख बाहेर
परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्राची उभारणी १९७१ मध्ये झाली. पाइपलाइनमधून पाण्याद्वारे ही राख तळ्यात सोडली जाते. पूर्ण क्षमतेने चालणाऱ्या एका संचासाठी दररोज ४ हजार मे.टन कोळसा लागतो. यातून ४०% म्हणजेच १६०० मे.टन राख दररोज बाहेर पडते. पैकी १ हजार मे.टन प्लाय ॲश (ओली राख) तर उरलेली ६०० मे.टन पाण्याद्वारे बाहेर सोडली जाते, असे सध्या एकूण तीन संच कार्यान्वित असून हे तिन्ही संच सुरू राहिले तर दररोज १८०० मे.टन राख बाहेर पडते.

हे तर मृत्यूचे ढिगारे...
दादाहरी वडगाव शेजारील राखेचे साठे हे आमच्या मृत्यूचे ढिगारे बनले आहेत. हजारो टिप्पर राख साठवून ठेवली असल्याने तळ्यातील राख संपली तरी आमच्या गावात पसरणारी राख या साठ्यामुळे थांबणार नाही. राखमुळे श्वसनाच्या व पोटाच्या आजाराने सर्वजण त्रस्त झाले आहेत. - शिवाजी घायाळ, ज्येष्ठ नागरिक.

अधिकारीही डांबले, पण आवाज दाबला जातो
अनेकवेळा निवेदने दिली, रास्ता रोको केला. काही वर्षांपूर्वी वीज निर्मिती केंद्राच्या अधिकाऱ्यांना गावात डांबून ठेवत आंदोलन केले. पण फायदा नाही. सध्या राख तळ्यावर माफियांचे राज्य आहे. आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबला जातो. बजरंग कुकर, सरपंच, दादाहरी वडगाव.

बातम्या आणखी आहेत...