आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्थांचे योगदान:गावाच्या विकासात ग्रामस्थांचे योगदान अत्यावश्यक आहे

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामविकासात ग्रामपंचायतीची भुमिका अतिशय महत्वाचीच आहे. परंतु, नागरिकांनीही आपापल्या जबाबदाऱ्या, कर्तव्ये पाळावेत. ग्रामस्थांचे योगदान असल्याशिवाय ग्रामविकास शक्य नाही. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपले गाव अग्रेसर व्हावे तर यात प्रत्येक घटकाला तळमळीने योगदान द्यावे लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श गाव पाटोद्याचे माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी व्यक्त केले.

होळ (ता.केज) येथे परिवर्तन गणेश मंडळ आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा व व्यायाम शाळेचे सचिव मधुकर खाडे महाराज होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. हनुमंत सौदागर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, जिल्हा बालकल्याण समितीचे माजी अध्यक्ष तत्त्वशील कांबळे, माजी सरपंच बाळासाहेब घुगे, ज्येष्ठ नागरिक आप्पा होट्टे, युवा वक्ते दत्ता घुगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. माजी सरपंच भास्कर पेरे पाटील म्हणाले, शिक्षण हे अत्यंत गरजेचे आहे.

त्यामुळे शाळा, विद्यालयांच्या भौतिक सुविधांकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच, आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी स्वच्छता हवी. याशिवाय, स्वच्छ पाण्याचा वापर केल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवणार नाही. यामुळे आरोग्यावरील कोट्यवधींचा खर्च टाळला जाऊ शकतो. आणि वृक्ष लागवडीकडे लक्ष देणे काळाची गरज आहे. त्याशिवाय पर्यावरण संतुलन शक्य नाही. याच बाबी ग्रामविकासाच्या पाया आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी देखील योगदान द्यावे. स्वतःच्या जबाबदाऱ्या समजून घेऊन अंमलबजावणी करावी. त्याशिवाय विकास होणे शक्य नाही, असे मत भास्कर पेरे पाटील यांनी व्यक्त केले. याप्रसंगी पत्रकार डॉ.हनुमंत सौदागर यांनी मनोगत व्यक्त केले. गणेश मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक धनराज लाटे यांनी केले. तर सुत्रसंचलन महेश घुगे यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रत्येकाने ठरवले तर गावाचा विकास अधिक गतीने होऊ शकेल
ग्रामविकास म्हणजे फार मोठ्या गोष्टी करण्यापेक्षा अगदी लहानात लहान गोष्टीपासून आपण परिवर्तन घडवून आणू शकतो. ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ या सर्वांनी ठरवले तर गावाचा विकास अधिक गतीने होऊन गावाला वेगळी ओळख मिळू शकते. त्यामुळे प्रत्येकाने त्या दृष्टीने प्रयत्नशील राहावे, असे आवाहन याप्रसंगी भास्करराव पेरे पाटील यांनी याप्रसंगी केले.

बातम्या आणखी आहेत...