आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्रसंकलन ठप्प:कोरोनामुळे अंधुक झाली राज्यातील अंधांच्या जीवनातील प्रकाशकिरणे! आशियातील सर्वात मोठ्या नेत्रालयात दीड वर्षात एकही नेत्र प्रत्यारोपण नाही

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना अहवालास 24 तास, डोळे राहतात 6 तासच जिवंत

कोरोनाचा मोठा फटका नेत्रदान चळवळीला बसला आहे. नेत्र संकलन जवळपास ठप्प झाल्याची स्थिती आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या जालना येथील गणपती नेत्रालयात मागील दीड वर्षात एकही नेत्र प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेली नाही. कोरोना महामारीने राज्यातील अंधांच्या आयुष्यातील प्रकाशकिरणे अंधुक झाली आहेत. कधी जन्मतः, तर कधी अपघाताने आलेल्या अंधत्वामुळे आयुष्यभर डोळ्यांसमोर अंधार घेऊन जगणाऱ्यांच्या आयुष्यात नेत्रदान चळवळीने प्रकाशकिरणे येत असतात. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन अंधांना हे जग पाहता येत असते. राज्यात दरवर्षी २५ आॅगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात नेत्रदान पंधरवडा दरवर्षी साजरा केला जातो.

नेत्रदानाबाबत समाजात जागृती व्हावी यासाठी या पंधरवड्यात विविध उपक्रम राबवले जातात. यंदाही बुधावारपासून या पंधरवड्याला सुरुवात झाली. दरम्यान, मार्च २०२० पासून सुरू झालेल्या कोरोना महामारीमुळे राज्यात नेत्रदान चळवळीसमोर ‘अंधार’ पसरलेला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचे नेत्रसंकलन करता येत नाही. इतर आजारांनी मृत पावलेल्यांचे नेत्रसंकलन कोरोना चाचणीशिवाय कसे करायचे असा पेच होता. याबाबत गतवर्षी कुठलीच मार्गदर्शक तत्त्वे शासनाने दिली नव्हती. कोरोना स्थिती नियंत्रणात आल्यानंतर नेत्रदान चळवळीला गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आकडा ७ हजारांहून दीड हजारावर
आरोग्य विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार, कोरोनापूर्वी राज्यात दरवर्षी ७ हजार नेत्र संकलन होत असे. यापैकी ४ हजार नेत्र प्रत्यारोपण केले जात. मात्र कोरोनानंतर राज्यात नेत्रदान घटले आहे. जूनअखेरच्या माहितीनुसार, वर्षभरात केवळ १३५५ नेत्र संकलन करण्यात आलेे. यामुळे नेत्र प्रत्यारोपणासाठी नोंदणी केलेल्या अंधांना आयुष्यात प्रकाशकिरणे येण्याची प्रतीक्षा आहे.

निम्म्याहून अधिक नेत्रसंकलन घटले
कोरोनामुळे राज्यात नेत्रसंकलनावर मोठा परिणाम झाला आहे. नियमित नेत्र संकलनाच्या तुलनेत कोरोनाकाळात ५० टक्क्यांहून अधिक नेत्रसंकलन कमी झाले आहे. नेत्रसंकलन वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - डॉ. पद्मजा जोगेवार, सहसंचालक, आरोग्य विभाग, मुंबई.

७०० जण प्रतीक्षेत
आमच्या रुग्णालयात महिन्याकाठी ४० ते ४५ नेत्रसंकलन होत असते. परंतु कोरोनामुळे दीड वर्षापासून ते ठप्प आहे. त्यामुळे नेत्र प्रत्यारोपण शस्त्रक्रियाही बंद आहेत. आमच्याकडे नोंदणी झालेले ७०० अंध नेत्र प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षेत आहेत. राज्याचा आकडा यापेक्षा अधिक आहे. - सुभाष राऊत, सहायक व्यवस्थापक, गणपती नेत्रालय, जालना

कोरोना अहवालास २४ तास, डोळे राहतात ६ तासच जिवंत
कोरोनाकाळात नेत्र संकलन घटण्याचे महत्त्वाचे कारण हे मृतदेहाची कोरोना चाचणी करण्याचा नियम आहे. गणपती नेत्रालयाचे सहायक व्यवस्थापक सुभाष राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाची आरटीपीसीआर चाचणी करण्याच्या सूचना आहेत. त्याचा अहवाल निगेटिव्ह असेल तरच नेत्र संकलन करता येते, मात्र आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल येण्यास २४ तास लागतात, तर व्यक्तीच्या मृत्यूनंतर ६ तासच त्याचे डोळे जिवंत असतात. त्यामुळे नेत्रसंकलन करता येत नाही, असे राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...