आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:चाटगाव येथील तलावाचा सांडवा पुन्हा फुटला

दिंद्रुडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धारूर तालुक्यातील चाटगाव तलावाचा सांडवा पुन्हा फुटला असून येथील तलावाची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. गेल्या वर्षीही कोणीतरी अज्ञाताने हाच सांडवा फोडल्याची तक्रार देण्यात आली होती. पुन्हा या वर्षीही हा सांडवा फुटल्याने आठ ते दहा दिवसांपासून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पाटबंधारे विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.

दिंद्रुडसह परिसरातील तीन ते चार गावांना व शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या चाटगाव तलावाचा सांडवा प्रत्येक वर्षी फोडण्यात येतो. मात्र तेलगाव पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी जाणूनबुजून जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. हा सांडवा फोडून आठ ते दहा दिवस झाल्याचे चाटगाव ग्रामस्थांनी सांगितले. सांडवा फुटल्याची कल्पना येथील सरपंचाने शाखाधिकारी यांना दिलेली असताना सांडवा बुजवण्यात आला नाही. त्यामुळे शेतकरी व चार गावच्या ग्रामस्थांकडून पाटबंधारे विभाग व संबंधित शाखा अधिकाऱ्या विरोधात संताप व्यक्त होत आहे.

गेल्या वर्षी ग्रामस्थांच्या सजगतेमुळे संबंधित विभागाने फुटलेला सांडवा दुरुस्त करण्यात आला होता. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे चाटगाव तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, त्यामुळे परिसरातील तीन ते चार गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व शेतातील पिकांना जगवण्याचे काम हा तलाव करतो. उन्हाळ्यात एप्रिल, मे या दोन महिन्यात पिण्याच्या पाण्याची उणीव भासते, नव्हे तर तलावातील पाणी कमी झाले तर प्रशासनाला टँकर चालू करून या तीन ते चार गावाच्या गावकऱ्यांची तहान भागवावी लागते. प्रत्येक वर्षी चाटगाव तलावाचा सांडवा फुटतो आणि लाखो लिटर पाणी वाया जाते. यावर्षी तर सांडवा फुटून आठ-दहा दिवस झाले असताना पाटबंधारे विभागाने कुंभकर्णी झोप घेतली आहे.

फुटलेल्या सांडव्या च्या ठिकाणी खोदकाम करुन,जाडी लावून सिमेंट काँक्रीट ची चादर टाकावी लागणार आहे. सध्या तलाव पूर्ण भरला असल्याने फुटलेला सांडवा बुजता येत नाही. त्यामुळे तलावातील पाणी कमी झाल्यास सांडवा दुरुस्त करण्यात येईल. - शेख वामीक, शाखाधिकारी पाटबंधारे उपविभाग तेलगाव.

कारवाई करा
दरवर्षी तलावाचा सांडवा फोडला जातो. पाटबंधारे विभागाला लाखो रुपयांच्या पाणीपट्टी कर आम्ही भरणा करतो. उन्हाळ्यात शेतीला व ग्रामस्थांना पाण्याची टंचाई भासते. पाणी वाया जात असताना शाखाधिकारी तलावाकडे फिरकले नाहीत. तलावातील पाणी पातळी कमी होण्याची वाट बघणाऱ्या संबंधित शाखाधिकाऱ्यांवर कारवाई करावी - उध्दव केकाण, शेतकरी चाटगाव

बातम्या आणखी आहेत...