आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाह:33 वर्षांपासून तिसऱ्या दिवशीच करण्यात येतो दशक्रिया विधी; जामगावातील परंपरा

पाटोदा6 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • धस कुटुंबीयांनी पाडला आदर्श पायंडा, सुमन धस यांचा दशक्रिया विधी करत रक्षेतून वृक्षारोपण

नातलगाच्या निधनानंतर दशक्रिया विधीसाठी दहा दिवसांचा लागणारा कालावधी व या काळात सर्वांचीच होणारी गैरसोय लक्षात घेत तब्बल ३३ वर्षांपूर्वी म्हणजे दिवंगत रामचंद्रदादा धस यांनी एक परिवर्तनवादी निर्णय घेत दशक्रिया विधी हा तिसऱ्याच दिवशी उरकण्याची परंपरा जामगाव (ता.आष्टी) येथे सुरू केली. आता या संपूर्ण भागात याच पद्धतीने दशक्रिया विधी करण्यात येत असून आमदार सुरेश धस व माजी जि.प.सदस्य देविदास धस यांनीही मातोश्री सुमन धस यांचा दशक्रिया विधी कार्यक्रम तिसऱ्या दिवशीच पार पाडला. यासह रक्षा विसर्जन नदीत न करता त्याचा वापर वृक्षारोपणासाठी करत पर्यावरणपूरक पायंडा पाडला.

पूर्वीच्या काळी संपर्काची व दळणवळणाची फारशी साधने नसल्याने मृत्यू झाल्यानंतर मृत्यूची बातमी नातेवाइकांपर्यंत समजण्यासाठी अनेक दिवस लागायचे. त्यामुळे त्या नातेवाइकांना दु:खात सहभागी होता यावे, यासाठी दहाव्या दिवशी दशक्रिया विधी केला जात असत. मात्र काळानुरूप अनेक रुढी परंपरा बदलल्या. सध्याचे युग हे धावपळीचे आहे. त्यामुळे या दहा दिवसांच्या कालावधीत कुटुंबीय व नातेवाइकांसह अनेकांची गैरसोय होते. त्यातच भावकी मोठी असेल तर गावातील लोक एखाद्याच्या निधनानंतर अडकून पडतात. यामुळे आष्टी येथील धस कुटुंबाकडून तिसऱ्याच दिवशी दशक्रिया विधी करण्याची आदर्श परंपरा सुरू केली गेली. सध्या या भागातील ८० टक्के लोक याचप्रमाणे विधी करतात.

पर्यावरणपूरक पद्धतीने रक्षा वापरत वृक्षारोपण करून दिवंगत व्यक्तीच्या स्मृती जपण्याचा पायंडा इथल्या नागरिकांनी पाडला आहे. नवी परंपरा सुरू केली आहे. रामचंद्र धस यांचे वर्ष २००७ मध्ये निधन झाले होते. त्यावेळीही आमदार सुरेश धस व देविदास धस यांनी त्यांचा दशक्रिया विधी तिसऱ्याच दिवशी केला होता. यासह आता मातोश्री सुमन धस यांचाही दशक्रिया विधी तिसऱ्याच दिवशी करण्यात आला. जामगाव येथील निवृतीदादा धस विद्यालयाच्या प्रांगणात हा विधी पार पडला. तसेच रक्षाविसर्जन नदीपात्रात केल्यास पाणी प्रदूषित होते. त्यामुळे त्या ऐवजी त्याचा उपयोग मातीत एकत्र करून चार झाडे लावण्यात आली.
अशा पध्दतीने पर्यावरपुरक स्मृतीही जपण्याची नवी परंपरा सुरु केली आहे.सध्याच्या धावपळीच्या काळात या विधीसाठी नाशिक, श्री क्षेत्र राक्षसभुवन या ठिकाणी जाण्यासाठी मोठी कसरत होते, अंतर जास्त असल्याने वेळेत पोहचता येत नाही अनेक वेळा काकस्पर्शही होत नाही. त्याला पर्याय म्हणुन ज्या त्या ठिकणी किंवा या भागातील सावरगाव, पारगाव या ठिकाणीही घाटावर हा विधी होऊ शकतो. त्यामुळे अनेकजण आता त्या ठिकाणी विधीसाठी जात असल्याचे दिसून येते.

कार्यकर्त्याच्या सांत्वनासाठी गेले आमदार सुरेश धस आमदार सुरेश धस यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी दशक्रिया विधी पार पाडण्यात आला. स्वत: मातृछत्र हरपल्याच्या दु:खात असतानाही धस यांनी मंगळवारी (ता.१४ मार्च) सावरगाव येथील कार्यकर्त्याच्या घरी भेट देत त्यांच्या कुटुंबातील मृताबद्दल शोक व्यक्त करत कार्यकर्त्याचे सांत्वन केले.

बातम्या आणखी आहेत...