आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्मिळ ठेवा:दोन शतकांपूर्वीचा ‘दशावतारी गंजिफा’ खेळ बाहेगव्हाणकर कुटुंबाकडून जतन

बीड6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पत्त्यांशी साधर्म्य असलेला व नवग्रह, दशावतारांची माहिती देणारा खेळ

पत्त्यांचा वापर करत विविध प्रकारचे खेळ खेळले जात असल्याचे आपण पाहतो. काळाच्या ओघात यातील काही प्रकार लुप्त झाले. पण बीड येथील माळीवेस भागातील बाहेगव्हाणकर कुटुंबीयांनी दोन शतकांपासून ‘दशावतारी गंजिफा’ हा पत्त्यांतून भारतीय संस्कृतीबाबत प्रसार करणारा खेळ पिढ्यानपिढ्या जतन केला आहे.

आबालवृद्ध फावल्या वेळेत पत्त्यांचे विविध खेळ खेळतात. खेळाशिवाय पत्त्याचा वापर जादुसाठी, भविष्य सांगण्यासाठी केला जातो. लहान मुले पत्त्यांचा बंगलाही बनवतात. ‘दशावतारी गंजिफा’ हा पत्त्यांशी साधर्म्य असलेला खेळ प्रकार. भारतात सोळाव्या शतकात हा खेळ आल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. बीडच्या माळीवेस भागातील रहिवासी तथा सावरकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांच्याकडे दोनशे वर्षांपूर्वीचा ‘दशावतारी गंजिफा’ खेळ आहे. बाहेगव्हाणकर यांचे आजोबा शाहुराव वकील हा खेळ खेळत. गोल आकाराच्या गंजिफांचा वापर खेळासाठी करत असताना नवग्रहांचे स्मरण, दशावतारांची माहिती, संस्कृतींची देवाण-घेवाण होते. पूजा करून या खेळाला सुरुवात होते. ‘दशावतारी गंजिफा’ खेळणे प्रारंभी शुभशकुन समजले जाते. गंजिफाच्या गोल पत्त्यांवर मासा, कमंडलू, परशू, वराह, सिंह, शंख, धनुष्य, तलवार, कासव, नरसिंह, वामन हे दशावतार रेखाटण्यात आलेले आहेत. खेळातील पारंपरिक, धार्मिक चित्रांतून पुरातन भारतीय संस्कृतीचे दर्शन होते. तत्कालीन समाजात धर्माविषयाची माहिती व जागृती व्हावी, हाही एक उद्देश गंजीफा खेळण्यामागे असल्याचे जुने जाणकार सांगतात.

मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन अशा पहिल्या पाच राजांची चित्रं पहिल्या पाच पत्त्यांवर असतात. या पाच अवतारांत वजीरानंतर एक्का ते दस्सा असा उतरता क्रम असतो. परशुराम ते कल्की यांची चित्रं उरलेल्या राजांच्या पत्त्यावर असतात. या अवतरांत राजा आणि वजीर यांचा दर्जा पहिल्या पाच अवतारांच्या पत्त्यांइतकाच असला तरी त्यानंतर दस्सा वरिष्ठ असून त्याच्या खाली नव्वा, अठ्ठा अशा क्रमानं एक्क्याला सर्वात खालचं स्थान असतं. प्रत्येक अवताराच्या चित्रांबरोबरच असणारा घोडेस्वार म्हणजे वजीर. त्या-त्या अवताराचं चित्र आणि एक ते दहा क्रमांक असलेले दहा पत्ते या खेळात असतात. गंजीफाच्या पत्त्यांवर विष्णूचे दशावतार (नऊ ग्रह, बारा राशी यांचेही पत्ते मिळू शकतात) चित्रित करण्यात येतात. यात प्रत्येक अवताराचे बारा पत्ते असतात. हा खेळ सकाळी खेळताना राम अवतारातील मुख्य अवताराचा पत्ता असलेली, तर सूर्यास्तानंतर कृष्ण अवताराचा मुख्य पत्ता असणारी व्यक्ती खेळास सुरुवात करते. सर्वाधिक पत्ते गोळा करणारी व्यक्ती यात विजयी होते. सध्याची खेळण्याची पद्धत ही आधुनिक पत्ते खेळाशी मिळती जुळती आहे. मात्र, पूर्वी वेगळ्या पद्धतीनं हा खेळ खेळला जात होता. बाहेगव्हाणकर कुटुंबीयांनी पिढ्यानपिढ्या या खेळाची संस्कृती प्रसाराची महती सांगत मोठ्या जाणिवेने हा खेळ पर्यायाने वारसा जपला, जोपासला आहे.

मनोरंजनासह सांस्कृतिक मूल्यांची देवाण-घेवाण :

जुन्या काळात या खेळात वस्तूंची देवाण-घेवाण केली जात असे. तर यातून सांस्कृतिक मूल्य जपण्याचा त्यांचा प्रयत्न होता. राजेरजवाड्यांच्या काळात मनोरंजनाचं साधन म्हणून हा खेळ खेळला जात असे.

दुर्मिळ ठेवा जपला आहे; नव्या पिढीला माहिती नाही

‘माझे वडील स्व. शाहुराव वकील बाहेगव्हाणकर हे ‘दशावतारी गंजिफा’ खेळत होते, त्यांचे तत्कालीन सहकारी स्नेही स्व. वामनराव वझे, धारूरकर वकील,नारायणराव देशपांडे, नागोराव कासार,अनंतराव चिंचपूरकर,गोडबोले हे ‘दशावतारी गंजिफा’ हा खेळ खेळण्यासाठी येत, तेव्हा मी शाळेत होतो. आता या खेळाची माहिती नव्या पिढीला नाही. आमच्या घराण्यातील अशा अनेक दुर्मिळ वस्तू आम्ही ठेवा म्हणून जतन करून ठेवल्या आहेत.’ - गोविंदराव बाहेगव्हाणकर, बीड.

बातम्या आणखी आहेत...