आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात ६७१ ग्रा.पं.च्या निवडणूक प्रक्रियेचा शेवटचा टप्पा म्हणजे मतमाेजणी आज मंगळवारी पार पडणार आहे. प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण केली गेली असून गेवराई वगळता इतर सर्व तालुक्यांत तहसील कार्यालयात मोजणी प्रक्रिया होईल. बीड आणि आष्टीत सर्वाधिक ग्रामपंचायतींचंी मोजणी असून दुपारी २ वाजेपर्यंत सर्व ग्रामपंचायतींचे निकाल हाती येतील.
बीड तालुक्यात १२१ ग्रामपंचायतींसाठी मोजणी प्रक्रिया होणार असून २४ टेबलांवरून १६ फेऱ्यांमध्ये मोजणी प्रक्रिया होणार असल्याची माहिती तहसीलदार सुहास हजारे यांनी दिली. गेवराई तालुक्यात ७५ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. ८२ टक्के मतदान झाले होते. पंचायत समिती कार्यालयात मतमोजणी करण्यात येणार असून एकूण १० टेबलांवर ९ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडणार आहे.
१२० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार सचिन खाडे यांनी दिली. दुपारी २ वाजेपर्यंत सर्व ग्रामपंचायतींचा निकाल हाती येण्याची शक्यता आहे. केज तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींची तहसीलच्या तळमजल्यात मतमोजणीची तयारी करण्यात आली आहे. मतमोजणी १४ टेबलांवर ५ फेऱ्यांमध्ये होणार आहे. २८ निवडणूक निर्णय अधिकारी, २८ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, १४ मतमोजणी पर्यवेक्षक, १४ सहायक मतमोजणी पर्यवेक्षक नियुक्त केल्याचे तहसीलदार दुलाजी मेंडके, नायब तहसीलदार लक्ष्मण धस यांनी सांगितले.
अंबाजोगाई : १५ टेबलांवर ५५ कर्मचारी
अंबाजोगाई तालुक्यातील मतमोजणीस एकूण १५ टेबल तयार करण्यात आले असून ५५ कर्मचारी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहेत. ७८ ग्रामपंचायतींचे सरपंच व ८१ ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी ही निवडणूक झाली आहे.
तहसीलदार विपिन पाटील, नायब तहसीलदार गणेश सरोदे, अव्वल कारकून शशिकांत गायकवाड आदी प्रशासकीय लोक यशस्वीपणे प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
पाटोदा : २९ ग्रा.पं., ११ टेबलांवर मोजणी
तालुक्यात २९ ग्रा.पं.साठी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी दहा वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात हाेईल. ११ टेबलवर तीन फेऱ्यांत माेजणी होणार असून दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार सुनील ढाकणे यांनी दिली.
वडवणी : ११ टेबल, ९ फेऱ्या
तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीसाठी ११ टेबल तयार करण्यात आले आहेत. वडवणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आनंद कांगुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे, असे तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी सांगितले.
परळी : ७६ ग्रा.पं.चा आज निकाल
तालुक्यातील ७६ ग्रा.पं.ची मतमोजणी २९ टेबलांवर होणार आहे. प्रत्येक टेबलवर ३ कर्मचारी व १ मास्टर ट्रेनर अशा ४ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरुवात होणार असून दुपारी १२ पर्यंत सर्व ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणार आहे.
माजलगावात : ५, धारुरमध्ये १० टेबलवर प्रक्रिया, ४० कर्मचारी
माजलगाव तालुक्यातील ४४ ग्रा.पं.ची मतमोजणी तहसिल कार्यालयात ५ टेबलवरुन होणार असून ३५ कर्मचारी नियुक्त केले गेले आहेत. तर, धारुरमध्ये २८ ग्रा.पं.साठी १० टेबलवर मोजणी होईल यासाठी ४० कर्मचारी नियुक्त केले गेले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.