आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुरवस्था:हस्तांतरापूर्वीच क्रीडा संकुलाची दुरवस्था; आमदार मुंंदडांनी कंत्राटदारास खडसावले

अंबाजोगाईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हस्तांतरित होण्यापूर्वीच गळत असलेल्या क्रीडा संकुलाची इमारत वादाचा विषय ठरत होती. क्रीडा संकुलाच्या ठिकाणी करण्यात आलेल्या कामाची शुक्रवारी (दि.२) आमदार नमिता मुंदडा यांनी पाहणी केली. कामासाठी वापरलेले सुमार दर्जाचे साहित्य पाहून संतापलेल्या आमदार मुंदडांनी शनिवारी तहसील कार्यालयात तडकाफडकी बैठक बोलावत संबंधित गुत्तेदार, वास्तुविशारद सल्लागार, अधिकाऱ्यांना खडसावत गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. यानंतर कंत्राटदाराने एक महिन्यात सर्व दुरुस्ती करून देण्याचे लेखी आश्वासन दिले.

शहरातील यशवंतराव चव्हाण चौकाजवळ कोट्यवधी रुपये खर्चून तालुका क्रीडा संकुलाची भव्य इमारत उभारण्यात आली. त्यासोबतच जॉगिंग ट्रॅक आणि बॅडमिंटन हॉलदेखील अंतर्भूत करण्यात आला. सन २०१९ मध्ये या इमारतीचे उद्घाटन देखील उरकून घेण्यात आले. तसेच कंत्राटदाराचे पूर्ण देयकही देण्यात आले. मात्र, त्यानंतर राहिलेली दुरुस्तीची कामे आणि कोरोनामुळे या इमारतीचे हस्तांतरण रखडले. दरम्यान, आ. नमिता मुंदडा यांनी क्रीडा संकुलाच्या रखडलेल्या कामात लक्ष घातले.

स्वतः आर्किटेक्ट असलेल्या आ. मुंदडा यांनी पाच वेळेस क्रीडा संकुलास भेट देऊन कामातील त्रुटी हेरल्या. ओबडधोबड बांधकाम, वापरलेले तकलादू साहित्य पाहून त्यांनी अनेक दुरुस्त्या सुचवल्या. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी पुन्हा क्रीडा संकुलाची पाहणी केली. यावेळी त्यांना नवीकोरी इमारत गळत असलेली आढळून आली. तसेच, बॅडमिंटन हॉल व कार्यालयीन बांधकामात अनेक उणिवा जैसे थे असून संकुलाच्या बाहेरील जॉगिंग ट्रॅकचे तळ्यात झालेले रूपांतर आणि स्वच्छतागृहातील साहित्य देखील सुमार दर्जाचे दिसून आले. बॅडमिंटन हॉलला लावलेले पारदर्शक पत्रे, गलका हॉल पाहून संतापलेल्या आ.मुंदडा यांनी शनिवारी दुपारी तहसील कार्यालयात तडकाफडकी बैठक घेतली.

या बैठकीस संबंधित कंत्राटदार, वास्तुविशारद सल्लागार यांना पाचारण करण्यात आले होते. आमदारांनी कामातील त्रुटी दूर न केल्याबद्दल खडसावले आणि महिनाभरात दुरुस्ती न केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. कंत्राटदाराने एक महिन्यात स्वखर्चातून संपूर्ण दुरुस्ती करण्याचे लिखित आश्वासन दिले. काम पूर्ण केल्याशिवाय इमारत हस्तांतरित करून घेऊ नये, असे आदेश यावेळी आमदार मुंदडा यांनी दिले. यावेळी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, तहसीलदार विपिन पाटील, गटविकास अधिकारी काळे, जिल्हा क्रीडा अधिकारी देशमुख, अरविंद विद्यागर, बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रशांत पाटील, केंद्रे, भाजप नेते गणेश कराड, शेख रहीम, भाजप तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, हिंदुलाल काकडे, वैजनाथ देशमुख, ॲड. संतोष लोमटे, गणेश देशमुख, खलील मौलाना, शरद इंगळे आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागातून खेळाडू घडावेत
बीड जिल्ह्यातील अविनाश साबळे या क्रीडापटूने जागतिक स्तरावर देशाचे नाव उंचावले. ग्रामीण भागातील युवकांमध्ये प्रचंड क्षमता असून त्यांना योग्य सुविधा आणि प्रशिक्षण मिळाल्यास अनेक जागतिक दर्जाचे खेळाडू निर्माण होतील. माझ्या मतदारसंघातूनही असेच खेळाडू घडावेत. उदयोन्मुख खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधांबाबत कसलीही तडजोड केली जाणार नाही. - नमिता मुंदडा, आमदार

बातम्या आणखी आहेत...