आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ई-लर्निंग अॅप:बीडमधून सुरू झालेले इझीटेस्ट ई-लर्निंग अॅप राज्यातील अकरावी - बारावीच्या विद्यार्थ्यांना खुले, धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले उदघाटन

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकरावी - बारावीमध्ये प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे कोरोनाच्या काळात नुकसान होऊ नये या उद्देशाने बीड जिल्हा परिषद व अभिनव आयटी सोल्युशन्स पुणे यांनी संयुक्तरित्या तयार केलेले इझिटेस्ट हे ई - लर्निंग अँप आज राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोफत खुले करण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते एक वेबिनार द्वारे या अँपचे उदघाटन करण्यात आले.

लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या टप्प्यात अकरावी - बारावी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे संभाव्य नुकसान टाळून त्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे मिळावेत यासाठी ना. धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पुढाकार घेत बीड जिल्हा परिषद व पुणे येथील अभिनव आयटी सोल्युशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने हे अँप जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिले होते. जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी या अँपद्वारे मोफत ऑनलाईन धडे घेतले.

आज या अँपचे राज्यस्तरावर लोकार्पण करण्यात आले. राज्यातील कुठल्याही विद्यार्थी - शिक्षकांना आता या अँपद्वारे ऑनलाईन शिक्षण घेता - देता येणार आहे. यावेळी ना. मुंडे यांच्यासह आ. प्रकाश सोळंके, आ. बाळासाहेब आजबे, आ. संदीप क्षीरसागर, आ. संजय दौंड, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, वेबिनारच्या माध्यमातून अभिनव आयटी सोल्युशन्सचे श्री. भुतडा तसेच विविध विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

इझिटेस्ट या अँपमध्ये बीड जिल्ह्यातील शिक्षकांनी अभ्यासक्रमाला अनुसरून तयार केलेले ऑनलाईन लेक्चर्स युट्युबच्या माध्यमातून अपलोड केले जातात तसेच ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या प्रश्न - शंकांचे समाधान करण्यात येते.

या अँपला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेत आता हे अँप राज्यातील अकरावी बारावी मध्ये प्रवेश घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत खुले करण्यात आले आहे. शिक्षकांनी नवनवीन संकल्पना राबवून या अँप मध्ये अकरावी बारावीचा अभ्यासक्रम सुकर करावा तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून या अँपचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी धनंजय मुंडे यांनी केले आहे.

असे आहे अँप

इझिटेस्ट हे अँप गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध असून यामध्ये तब्बल ७०० तासांची रेकॉर्डिंग असलेले ऑनलाईन वर्ग (classroom) पद्धतीने विषय पाठनिहाय अपलोड केलेले आहेत. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यातील शिक्षकांनीच हे पाठ अत्यंत अभिनव पद्धतीने तयार केलेले आहेत.

कुठल्याही अँड्रॉइड मोबाईल फोनमध्ये हे अँप डाउनलोड करून अकरावी - बारावीच्या विद्यार्थ्यांना आता मोफत धडे व प्रश्नोत्तरे मिळवता येणार आहेत.