आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्थांची गैरसोय:प्रशासनाच्या लेखी अख्खे गावच हरवलेय;  ऑनलाइन कागदपत्रांसाठी लोकांचे हाल

दिलीप झगडे | माजलगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सन १९८६ मध्ये उपळी येथील ऊर्ध्व कुंडलिका प्रकल्पामुळे नागझरी (गायमुख) या गावाचे पुनर्वसन झाले. गावंदरा ग्रुप ग्रामपंचायतीत समाविष्ट असलेले हे गाव पुनर्वसनानंतर माजलगाव तालुक्यात आले. या गावचे मतदान शेजारील पुनंदगाव ग्रुप ग्रामपंचायतीत आले. मात्र लालफीतीच्या कारभारामुळे नागझरी (गायमुख) हे गावचं हरवलेयं. ग्रामस्थ जेव्हा ग्रामपंचायतीत रहिवाशी प्रमाणपत्रासह कुठलाही दाखल आणण्यास जातात तेव्हा त्यांना ऑफलाईन कागदपत्रे दिली जातात. ऑनलाईन दाखला मागताच त्यात नागझरी (गायमुख) गाव दिसतंच नाही.

लालफीतीच्या कारभारामुळे आमचे गावचं हरवले, अशी म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. दोनशेवर मतदारसंख्येचे नागझरी (गायमुख) गाव. पुनर्वसनानंतर हे गाव २ जुन १९८६ रोजी चिंचगव्हाण (ता.माजलगाव) शिवारातील सर्वे क्रमांक ८ मध्ये हलवण्यात आले. पुनर्वसित झालेल्या ५० कुटुंबासाठी एकूण ५ एकर आठ गुंठे जागा शासनाच्या वतीने देण्यात आली. यात दोन गुंठे क्षेत्र प्रत्येक कुटुंबाला घरासाठी देण्यात आले. यासह उर्वरित जि.प.शाळा, महादेव मंदिर व समाज मंदिरासाठी यासाठी आरक्षित ठेवण्यात आली.

पुनर्वसनानंतर महसुली गाव म्हणून नागझरी (गायमुख) ची नोंद माजलगाव तालुक्यातून होणे अपेक्षित होते. परंतु, तसे झाले नाही. परिणामी धारूर तालुक्यात हे गाव तांत्रिकदृष्ट्या समाविष्ट राहिले. आज धारूर तालुक्यातून या गावची लोकसंख्या पाहिली तर इथे लोकसंख्या शून्य दाखवण्यात येते. डे माजलगाव तालुक्यात प्रशासकीय नोंदीत हे गावच अस्तित्त्वात नाही. पुनर्वसित नागझरीला पुनंदगाव या ग्रामपंचायतीला जोडण्यात आले. २०१७ ते २०२२ दरम्यान नागझरीतून एक सरपंच व पाच सदस्य पुनंदगाव पंचायतीवर निवडून आले, तरी त्यांना कागदोपत्री स्वत: कोणत्या गावचे नागरिक आहेत हे सांगता येत नाही. ग्रामस्थ दाखले घेण्यासाठी ग्रामपंचायतीत जातात तेंव्हा त्यांना ऑफलाईन पध्दतीने दाखले दिले जातात.

लोकशाही दिनात प्रश्न मांडून हाती काहीच नाही
५ सप्टेंबर २०२२ रोजी लोकशाही दिनात ग्रामस्थांनी आपल्या गावाची कुठेही नोंद नसल्याचा विषय जिल्हा प्रशासनापुढे मांडला. आरडीसींकडून झेडपीकडे, झेडपीकडून पंचायत समिती, तहसील कार्यालयाकडे पत्रे गेली. मात्र अजूनही नागझरी (गायमुख) शासन दफ्तरी नोंद झालेली नाही.

मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय
पुनंदगाव ग्रामपंचायतीला येथील दोनशेंवर ग्रामस्थांचे मतदान जोडलेले आहे. या पूर्वी दोनदा ग्रामस्थांनी याठिकाणी मतदान केले. यंदा मात्र ग्रामस्थांनी आम्हाला आमचे गाव पुन्हा कागदावर आणून द्या म्हणत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

अामच्या गावाचे रहिवासी प्रमाणपत्रही मिळत नाही
सन १९८६ मध्ये आमच्या जमिनी, घरे सोडून आम्ही माजलगाव तालुक्यात पुनर्वसित झालोत. इथे केवळ दोन गुंठ्यांवर आमची बोळवण करण्यात आली. या उपर आमच्या गावाची ओळखही हरवली आहे. शासन दरबारी आमचे गावचे अस्तित्वातच नसल्याने आम्ही हैराण झालोत. रहिवाशी प्रमाणपत्रही आमच्या गावाने मिळत नाहीये.’- बाबाराव बाजीराव मुरकुटे, ग्रामस्थ, नागझरी गायमुख.

बातम्या आणखी आहेत...