आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिकीट दर:नगर ते आष्टीपर्यंत 40 रुपये, तर आष्टी ते नारायणडोहपर्यंत 35 रुपये तिकीट दर

बीड/आष्टी10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर ते आष्टी या ६५ किलोमीटर अंतरावर आज शुक्रवारी पहिली प्रवासी रेल्वे धावणार आहे. या रेल्वेमार्गावर एकूण सहा थांबे असून रेल्वे प्रवाशांसाठी ४० रुपये तिकीट दर आकारला जाणार आहे. आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करणार आहेत. बीड जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा बनलेल्या नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाची एकूण लांबी २६१ किलोमीटर असून नगरपासून आष्टीपर्यंत ६५ किलोमीटर अंतराचे काम पूर्णही झाले आहे. नगर ते नारायणडोह दरम्यान सात किलोमीटर अंतरावर मार्च २०१८ रोजी सात डब्यांच्या रेल्वेची चाचणी झाली होती.

नंतर नगर-नारायणडोह-सोलापूरवाडी या १५ किलोमीटर अंतरावर २५ फेब्रुवारी २०१९ रोजी सात डब्यांची रेल्वे चाचणी झाली. आष्टीपर्यंत कधी रेल्वे चाचणी होणार हा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर सोलापूरवाडी ते आष्टी ३२ किमी अंतरावर २० डिसेंबर २०२१ रोजी चाचणी घेण्यात आली होती. दरम्यान, आष्टी तालुक्यातील नारायणडोह, लोणी, सोलापूरवाडी, धानोरा, कडा व आष्टी या सहा स्टेशनवर तिकीट विक्री सुरू केली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

उद्योगासाठी मिळणार चालना आष्टीसह पाथर्डी, जामखेड, कर्जत, पाटोदा, शिरूर, बीड या तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना पुणे, मुंबई आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी या रेल्वेचा फायदा होणार आहे. तसेच व्यापाऱ्यांना मुंबई, पुणे, दिल्ली, इंदूर, गुजरात, सुरत इत्यादी ठिकाणांहून माल आणण्यास या रेल्वेगाडीचा फायदा होईल.

आज केंद्रीय रेल्वे राज्मंत्री दानवे, मुख्यमंत्री शिंदे दाखवणार हिरवी झेंडी
परळी-बीड-नगर रेल्वे मार्गावर आज शुक्रवार २३ सप्टेंबर २०२२ रोजी पहिल्यांदाच नगर ते आष्टी प्रवासी रेल्वे धावणार आहे. याचा शुभारंभ शुक्रवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता हिरवी झेंडी दाखवून होईल. त्यांच्या समवेत खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील उपस्थित राहणार आहेत.

डॉ. प्रीतम मुंडे, आमदार सुरेश धस यांच्याकडून रेल्वे प्रशासनाला सूचना
बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे, आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे यांनी गुरुवार २२ सप्टेंबर २०२२ रोजी या रेल्वेमार्ग व आष्टी येथील नवीन रेल्वेस्थानकाची पाहणी करत अधिकारी व रेल्वे प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या.

नगर-बीड-परळी रेल्वेचा इतिहास
तत्कालीन माजी ‌पंतप्रधान इंदिरा गांधी या १९७२ मध्ये दुष्काळी भागाची पाहणी ‌करण्यासाठी आल्या तेव्हा कळंब येथे त्यांनी नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे सूतोवाच केले होते. त्यांनतर बीड जिल्ह्याच्या दिवंगत खासदार केशरकाकू क्षीरसागर यांनी पंतप्रधानांच्या भेटीसाठी शिष्टमंडळे नेले होते. परंतु या मार्गाला चक्क रेल्वे बोर्डाचीही मान्यता नसल्याचे समोर आले. त्यांनतर दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे बीड जिल्ह्याचे खासदार होताच या रेल्वेच्या प्रश्नाला गती मिळाली. या मार्गासाठी आर्थिक तरतूदही होऊन विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि विमलताई मुंदडा या बीडच्या मंत्री होत्या त्यांच्या काळात मार्गासाठी अर्धा खर्च राज्य आणि अर्धा खर्च केंद्र सरकारने उचलावा, असा निर्णय झाला.

बातम्या आणखी आहेत...