आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड येथे समोर आलेल्या गर्भलिंगनिदान आणि अवैध गर्भपात प्रकरणात गर्भलिंगनिदान करणाऱ्या तरुणाला रविवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगरमधून बेड्या ठोकल्या. सतीश बाळू सोनवणे (रा. जाधववाडी, जि. औरंगाबाद) असे त्याचे नाव असून तो शिकाऊ डॉक्टर आहे. एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात तो शिक्षण घेत आहे. एसपी नंदकुमार ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी एएसपी सुनील लांजेवार, डीवायएसपी संतोष वाळके, एलसीबी पीआय सतीश वाघ यांची उपस्थिती होती.
शीतल गाडे (रा. बकरवाडी) या महिलेचा अवैध गर्भपात करताना मृत्यू झाल्यानंतर गर्भलिंगनिदान करून गर्भपात केल्याचे स्पष्ट झाले होते. यात, पोलिसांनी ७ जून रोजी मनीषा सानप या अंगणवाडी सेविकेला अटक केली होती तर, मृत महिलेचा पती, भाऊ, सासरा व एका लॅबचालकाला अटक केली गेली होती. यात आरोपी असलेल्या गर्भपात करणाऱ्या परिचारिकेने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, गर्भलिंगनिदान करणारा डॉक्टर फरार होता. रविवारी नगरमधून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सतीश सोनवणे याला अटक केली.
जालन्याचे गवारे कनेक्शन : दरम्यान, या प्रकरणात जालन्यात कारवाई केलेल्या डॉ. सतीश गवारे या डॉक्टरचीही लिंक असण्याची शक्यता आहे. सतीश सोनवणे हा गवारे याला सहायक म्हणून काम करत होता. गवारे व अंगणवाडी सेविका मनीषा सानप यांची ओळख होती. गवारे हा गेवराईत येत होता अशी माहिती आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यात जालना आरोग्य विभागाने त्याच्यावर कारवाई केल्यानंतर मनीषाने सतीशच्या माध्यमातून गर्भलिंगनिदानाचे काम सुरू ठेवले.
सखोल तपास करणार
गर्भलिंगनिदानाचा हा गुन्हा सामाजिक गुन्हा आहे. कोणत्याही दबावाशिवाय बीड पोलिस या प्रकरणाचा तपास करतील. सर्व साखळी आम्ही समोर आणू. तपासात अनेक बाबी समोर येतील.
- नंदकुमार ठाकूर, पोलिस अधीक्षक, बीड
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.