आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय बालगृहातील प्रकार:चिमुकल्यांना बाथरूम-भांडी घासायला, फरशी पुसायला लावले

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालहक्क कार्यकर्त्यांनी शासकीय बालगृहात दाखल केलेल्या मुलांना बालगृहातील कर्मचाऱ्यांनी चक्क संडास-बाथरूम व भांडी घासायला लावली, फरशी पुसायला लावली आणि हे न केल्यास जेवण दिले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, मुलांनी केलेले हे आराेप वसतिगृह प्रशासनाने फेटाळले आहेत.

बीड शहरातील रस्त्यावर भीक मागणाऱ्या आदिवासी पारधी समाजातील सहा मुलांना बालहक्क समितीच्या कार्यकर्त्यांनी शिक्षणप्रवाहात आणण्यासाठी ९ ऑगस्ट रोजी शासकीय बालगृहात दाखल केले होते. मात्र, त्या ठिकाणचे कर्मचारी, केअर टेकर आणि अधीक्षक यांनी या मुलांना मारहाण केली. धक्कादायक म्हणजे संडास, बाथरूम, भांडी घासायला आणि फरशी पुसायला लावले, काम नाही केले तर जेवण देत नव्हते असे मुलांनी माध्यमांना सांगितले.

लक्ष देऊन आदिवासींचे हाल तातडीने थांबवावेत
आम्ही संस्थेच्या वतीने बालकल्याण समितीसमोर मुलांना सादर केलं. त्यांनी जागतिक आदिवासीदिनी त्यांना शासकीय बालगृहात प्रवेशित करून घेतले. परंतु त्यानंतर ८ दिवसांतच त्या मुलांना तिथून बाहेर काढून दिले. हे गंभीर आहे. सरकारने या प्रकाराकडे लक्ष देऊन आदिवासींचे हाल थांबवावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांनी केली आहे.

रागावल्यामुळे मुलांनी आमच्यावर आरोप केले
याबाबत बालगृहाचे अधीक्षक नितीन ताजनपुरे म्हणाले, मुलांना आम्ही स्वावलंबी व्हावे म्हणून त्यांची जेवण केलेली भांडी घासायला लावत होतो. त्यांना मारहाण केली नाही. लहान मुलांची आपापसात मारामारी सुरू व्हायची. त्यांच्यावर ते रागावल्यामुळे ते अशा पद्धतीने आरोप करत आहेत. मुलांना नातेवाइकांची आठवण आल्यामुळे ते निघून गेल्याचे सांगितले.

पालक म्हणतात...
आमची मुलं शिकून मोठी होतील यासाठी आम्ही इथे पाठवली होती. मात्र, इथे वेगळंच पाहायला मिळालं. मुलांना मारहाण झाली. त्यामुळे मुले शाळेचं नाव काढलं तरी भीत आहेत, असे पालक सुरेखा पवार यांनी सांगितले. तर, आम्हाला वाटत होतं की मुलांनी भीक न मागता शिकून मोठं व्हावं, मात्र मारहाण केल्याने मुले बालगृहाचे नाव काढताच पळून जात आहेत, असे पालक शिवाजी पवार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...