आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वर्षभरापासून प्रियकारासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या प्रेयसीवर तिच्या प्रियकराने प्रथम अॅसिड हल्ला केला. नंतर पेट्राेल टाकून पेटवून देत खदानीत फेकले. दिवाळीसाठी पुण्याहून शुक्रवारी सायंकाळी गावी जाताना बीड जिल्ह्यातील येळंबघाट येथे मुक्कामी थांबून शनिवारी पहाटे प्रियकराने पुण्याहून निघण्यापूर्वी आखलेला प्लॅन प्रत्यक्षात उतरवला. तब्बल बारा तासानंतर म्हणजे शनिवारी दुपारी या तरुणीच्या विव्हळण्याच्या आवाजाने एका व्यक्तीने खदानीत डोकावले असता हा प्रकार समोर आला. पाेलिसांच्या मदतीने तिला तातडीने रुग्णालयातही हलवले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. नेकनूर पोलिसांनी देगलूर पोलिसांच्या मदतीने आरोपी प्रियकराला रविवारी दुपारी अटक केली. सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
शेळगाव (ता. देगलूर जि. नांदेड) येथील सावित्री दिगंबर अंकुमवार (वय २२) ही तरुणी गावातीलच अविनाश रामकिसन राजुरे (२४) या तरुणाच्या प्रेमात होती. वर्षभरापूर्वी ते दोघे गावातून पळून पुणे जिल्ह्यातील शिरुरला गेले होते. तेथे ते ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहत होते. शुक्रवारी सायंकाळी दिवाळीसाठी गावी जाण्यासाठी ते दुचाकीने निघाले. रात्री उशिरा ते येळंबघाटजवळील एका मंगल कार्यालयाच्या परिसरात झोपले. शनिवारी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान अविनाशने सावित्रीचा गळा आवळला. त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर, छातीवर अॅसिड ओतले. एवढ्यावरही न थांबता त्याने पेट्रोल ओतून सावित्रीला पेटवून देत एका खदानीत ढकलून तेथून पळ काढला.
पेटवून देऊन गाव गाठले; प्रियकर अटकेत
दरम्यान, सावित्रीला पेटवून देत अविनाशने थेट शेळगाव गाठले, शनिवारी गावी दिवाळी साजरी केली. संध्याकाळी त्याला आपल्याला पोलिस शोधत असल्याची माहिती मिळाल्याने तो गावातून पसार झाला. मात्र, देगलूर पोलिस आणि नेकनूर पोलिसांच्या समन्वयातून रविवारी दुपारी अविनाशला अटक केली गेली.
राज्यभरात पडसाद, टीका, चौकशी
या प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटले असून आरोपीला अटक करावी, कठोर शासन करावे, प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, टास्क फोर्सकडून चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली. तर, पालकमंत्री धनंजय मुंडेंनीही पोलिस अधीक्षकांशी चर्चा करून सूचना दिल्या.
बारा तास वेदनांनी विव्हळली
तब्बल बारा तास जखमांनी आणि वेदनेने विव्हळत सावित्री खदानीत पडून होती. शनिवारी दुपारी एका नागरिकाला अर्धवट जळालेल्या अवस्थेतील तरुणी दिसल्याने त्याने नेकनूर पोलिसांना माहिती दिली. केजचे उपविभागीय पोलिस अधिकारी भास्कर सावंत, नेकनूरचे एपीआय लक्ष्मण केंद्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन तरुणीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
मृत्यूशी झुंज अपयशी, जबाब दिला
दरम्यान, ४८ टक्के भाजलेल्या सावित्रीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. रविवारी सकाळी तिचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तत्पूर्वी शनिवारी रात्रीच नेकनूर पोलिसांनी तरुणीचा मृत्यूपूर्व जबाब नोंदवून या प्रकरणात अविनाश राजुरे विरोधात गुन्हा नोंद केला होता.
सखोल तपास सुरू
या प्रकरणात सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू केला गेला आहे. आरोपीला अटक केली आहे. त्याने प्रेयसीचा खून का केला, काय कारणे होती, यासह इतरही काही अँगलने चौकशी सुरू आहे. पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. - भास्कर सावंत, उपविभागीय पोलिस अधिकारी, केज
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.