आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:वृक्षाला गणेशाचा मुखवटा, विसर्जनाऐवजी होते वृक्षारोपण

संदिपान तोंडे | धारूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

८१ वर्षांची परंपरा असलेले बीड जिल्ह्यातील धारूर येथील नवक्रांती गणेश मंडळ मागील ५ वर्षांपासून गणेशोत्सवात प्रत्यक्ष गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना न करता आंब्याच्या झाडाला गणपती बाप्पाचा मुखवटा लावून स्थापना करत आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा केला जात आहे. प्रसादासाठी पैसे न घेता गणेशभक्तांकडून वह्या व पेन घेऊन अनाथालय किंवा मूकबधिर शाळांना हे शैक्षणिक साहित्य भेट देत आहेत.

धारूर याच शहरात स्वातंत्र्यपूर्व काळात सन १९४१ मध्ये मुख्य बाजारपेठेतील क्रांती चौकात नवक्रांती गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली होती. यंदा या गणेश मंडळाचे ८१ वे वर्ष आहे. २०१८ मध्ये येथील नवक्रांती गणेश मंडळाने १२ फुटांची गणेशमूर्ती खरेदी करून गणपतीची प्रतिष्ठापना केली होती. परंतु त्या वर्षी शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने गणपतीचे कुठे विसर्जन करायचे असा प्रश्न निर्माण झाला. शहरात एक मध्यवर्ती तलाव आहे, परंतु या तलावात एवढी मोठी गणेशमूर्ती विसर्जित केली तर जलप्रदूषण होईल. हा धोका लक्षात घेऊन या गणेश मंडळाने मूर्तीचे विसर्जन केले नाही. मंडळाने क्रांती चौकात असलेल्या लिंगायत मठात ही गणेशमूर्ती तशीच ठेवली, ती आजही आहे.

२०१९ पासून या मंडळाने गणेशोत्सवात गणेशमूर्ती खरेदी न करता पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. आंब्याचा झाडाला गणपतीचा मुखवटा लावून बसस्थानक ते क्रांती चौक अशी दोन तासांची मिरवणूक काढली. मिरवणुकीनंतर गणपतीचा मुखवटा असलेल्या आंब्याच्या झाडाची त्यांनी प्रतिष्ठापना केली आणि गणेशोत्सवात दोन वेळा आरती, पूजा सुरू केली. मंडळाने आम्हाला पैसे देऊ नका, त्या बदल्यात दोन वह्या आणि पेन देण्याची विनंती केली. प्रसादाच्या बदल्यात मिळणारे शैक्षणिक साहित्य अनाथाश्रम, मूकबधिर शाळांना हे साहित्य भेट देण्याचा उपक्रम सुरू केला.

नऊ विद्यार्थी दत्तक घेतले
मंडळाने मागील वर्षी जे विद्यार्थी शिकवणी फी भरू शकत नाहीत, असे नऊ विद्यार्थी दत्तक घेतले आणि त्यांचा शैक्षणिक खर्च भागवला. महाप्रसादासाठी कोषाध्यक्ष प्रवीण शेटे, डेकोरेशनसाठी सचिव दिनेश कापसे, बाळू गुळवे, शालेय साहित्यासाठी प्रमोदकुमार तिवारी, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे हे खर्च उचलतात.

रक्तदान शिबिराचे समाजभान प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिर हाेते. संकलित रक्त अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाला भेट दिले जाते. ८५ विद्यार्थ्यांना सतरंजी व ब्लँकेट वाटप केले होते. हे मंडळ गुणवंत विद्यार्थी सत्कार, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत, व्यसनमुक्ती, असे उपक्रम राबवत आहे. अशा प्रकारे सामाजिक सलोखा जपला जात आहे, असे अध्यक्ष अमरजित तिवारी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...