आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मुलगा, मुलीस असमान वागणूक हे चित्र चिंताजनक;  डॉ. वृषाली किन्हाळकर यांचे प्रतिपादन

अंबाजोगाई6 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

कालच्या स्त्रीचे जीवघेणे प्रश्न असलेले बालविवाह, विधवा प्रश्न, सती प्रथा संपवण्यासाठी राजाराम मोहन रॉय, महात्मा गांधी, महर्षी धोंडो केशव कर्वे, र.धों. कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. मात्र आजही काही प्रश्न कायम आहेत. स्त्री-पुरुष समानता अजूनही पुर्णपणे दिसत नाही. मुलगा हाच वंशाचा दिवा, ही मानसिकता अद्याप बदललेली नाही, हे चिंताजनक आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक वृषाली किन्हाळकर यांनी व्यक्त केले.

अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील तक्रार निवारण समिती व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र अंबाजोगाई यांच्या वतीने ‘स्त्री : काल, आज आणि उद्या’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया हे होते तर महिला आयोग सदस्या संगीता चव्हाण, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान बीड जिल्हा समन्वयक अॅड.प्रज्ञा खोसरे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र अंबाजोगाईचे उपाध्यक्ष दगडू लोमटे, कोषाध्यक्ष अभिजीत जोंधळे, उपप्राचार्य डॉ. रमेश शिंदे यांची उपस्थिती होती. संगीता चव्हाण म्हणाल्या, आजच्या पिढीने आचार-विचार यांची सांगड घालत वर्तन करणे आवश्यक आहे आहे, तरच सुसंस्कारीत पिढी निर्माण होईल. यासाठी महामानवांनी दिलेला विचाराचा जागर सर्वांनी आचरणात आणला पाहिजे. अनिकेत लोहिया म्हणाले, आजची स्त्री सक्षम आणि खंबीर आहे, हे परिवर्तनाचे निदर्शक म्हणता येईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांनी केले.

एका दिवसापुरते नव्हे, स्त्री सन्मान नेहमी व्हावा एखाद्या विशिष्ट दिवशीच महिलांना आदर द्यायचा अन‌् एरवी त्यांना असमानतेची वागणूक द्यायची हे चुकीचे आहे. त्यामुळे एका दिवसापुरताच महिलांचा सन्मान न होता तो कायमस्वरूपी होणे गरजेचे आहे. स्त्री संघर्ष रोजचाच आहे. त्यातून तिने सुखाचे क्षण वेचत आयुष्य जगले पाहिजे, असे प्रतिपादन अॅड. प्रज्ञा खोसरे यांनी केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. मनोरमा पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन समन्वयक डॉ.आहिल्या बरुरे यांनी केले. या वेळी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...