आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील बीड-नगर रोडपासून जुन्या वटणवाडीपर्यंतचा ग्रामीण मार्ग असला तरी एक किलोमीटर रस्ता नरवडे वस्तीवरील स्थानिकांचा ‘जागा आमची असून आमच्या घरांसमोरून रस्ता करायचा नाही’ असा विरोध आहे. ग्रामस्थांनी दोन महिन्यांपासून रस्ता अडवलेला आहे. दरम्यान, याप्रकरणी सोमवारी आष्टीचे तहसीलदार जायमोक्यावर जाऊन पंचनामा करणार आहेत.
बीड-नगर मार्गाजवळील वटणवाडी जुन्या गावावरून ग्रामीण मार्ग जातो. २००१ मध्ये शासनाने निधी खर्च करून १ किमीचा रस्ता तयार केला. यानंतर या रस्त्याला ग्रामीण मार्ग ७६ असा क्रमांक मिळाला. परंतु, या रस्त्याची जागा आमची आहे. आमच्या घरासमोरून जायचे नाही असे म्हणत नरवडे वस्तीवरील स्थानिकांनी रस्त्यावरून जाण्या-येण्यास मज्जाव केला आहे. वटणवाडी गाव अस्तित्वात आल्यापासून या गावाला एकच वहिवाटीचा रस्ता आहे. पावसाळा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे करायची असून याच मार्गावरून शेतात जावे लागते. परंतु, मागील ५० दिवसांपासून काही स्थानिक या रस्त्यावरून जायचे नाही म्हणून अडवणूक करताहेत.
त्यामुळे सध्या शेतीबरोबरच दूध संकलनासाठी ये-जा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. यामुळे शेतकरी रात्री-अपरात्री येथील नदीच्या मार्गाने ये-जा करताहेत. याबाबत काही शेतकऱ्यांनी तहसीलदारांना पत्र दिले असून नगर-बीड राष्ट्रीय महामार्ग ते ग्रामीण मार्ग अशा एक किमी लांबी व १० मीटर रुंदीचा रस्ता खुला करून रस्त्यावरील अतिक्रमण काढावे, अन्यथा १५ जूनपासून आष्टी तहसील कार्यालयासमोर शेतकरी उपोषण करणार असल्याची माहिती भगवानराव शिनगिरे यांनी दिली.
रस्ता वाहतुकीसाठी खुला करून नाही दिला तर उपोषण करणार
मागील २ महिन्यांपासून या नरवडे वस्तीवरील स्थानिक लोक जाणाऱ्या येणाऱ्या शेतकऱ्यांना शिवीगाळ करताहेत. यापूर्वी आम्ही तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. जर रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला नाही तर आष्टी तहसीलसमोर उपोषण करणार आहोत.
-भगवान शिनगिरे, माजी सरपंच, वटणवाडी
सोमवारी पंचनामा करणार
या रस्त्याबाबत मी मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याशी चर्चा केली. मी स्वत: सोमवारी (१३ जून) जायमोक्यावर जाऊन पंचनामा करणार आहे.
-विनोद गुंड्डमवार, तहसीलदार,आष्टी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.