आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यम धनसंपदा:उपचारांसाठी गोरगरिबांचा खर्च वाचला; 65 हजार जणांना लाभ

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील गरीब, सामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या रुग्णांचा खासगी रुग्णालयात उपचारांवर होणारा लाखो रुपयांचा खर्च आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेमुळे वाचला आहे. मागील दोन वर्षांत जिल्ह्यातील ६५ हजार १७५ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेत आजारातून मुक्ती मिळवत निरामय आयुष्याकडे पाऊल टाकले आहे.

वाढत्या महागाईच्या काळात आजारांवर होणारा खर्च हा सामान्य आर्थिक परिस्थिती असलेले मध्यमवर्गीय आणि गरिबांच्या आवाक्याबाहेरचा ठरतो आहे. खासगी रुग्णालयांमध्ये होणारा हजारो, लाखोंचा खर्च परवडत नसल्याने कुणावर उपचार थांबवण्याची वेळ येऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने २०१३ मध्येच राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरु केली होती. त्यानंतर या योजनेचे नाव बदलून ती महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना केली गेली. तर, २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आयुष्यमान भारत ही आरोग्य विषयक योजना केंद्र सरकारने सुरु केली होती. २०२० मध्ये या दोन्ही योजनांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून दीड लाख रुपयांपर्यंतच्या ९९६ विविध प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार केले जातात.

जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजनेत १ लाख ४३ हजार कुटुंबातील ५ लाख ८२ हजार सदस्य उपचारांसाठी पात्र ठरलेले आहेत. सन २०११ मधील सामाजिक, आर्थिक जनगणनेच्या आधारे या कुटुंबाची निवड केली गेलेली आहे. त्यांना उपचारांसाठी आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढणे आवश्यक असते. महात्मा ज्योतिबा फुले योजना ही सर्वांसाठी लागू आहे. जिल्ह्यात २०२० पासून आतापर्यंत ६५ हजार १७५ जणांनी लाभ घेतल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

२४ खासगी रुग्णालयांची नोंद : जिल्ह्यात या योजनेतून उपचार घेण्यासाठी २४ खासगी रुग्णालयांनी शासनाकडे नोंद केली आहे. यामध्ये, आधार हॉस्पिटल, योगिता नर्सिंग होम, कराड हॉस्पिटल, संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल, साबळे हॉस्पिटल, गांधी हाॅस्पिटल, काकू नाना हॉस्पिटल, कृष्णा हॉस्पिटल, घोळवे हॉस्पिटल, तिडके हॉस्पिटल, पॅराडाईज हॉस्पिटल, प्रशांत हॉस्पिटल, न्यू लाईफ स्त्री रुग्णालय, मातोश्री हॉस्पिटल, यशवंतराव जाधव मेमोरियल हॉस्पिटल, लाइफ लाइन हाॅस्पिटल, विठाई हॉस्पिटल, वीर हॉस्पिटल, शुभदा हॉस्पिटल, केएसके हॉस्पिटल, स्पंदन हॉस्पिटल, धूत हॉस्पिटल, सिद्धिविनायक नेत्रालय, सानप रुग्णालय यांचा समावेश आहे.

मदतीसाठी आरोग्य मित्र
सरकारी किंवा खासगी रुग्णालयात या योजनेतून उपचार घ्यायचे असल्यास प्रत्येक ठिकाणी दोन आरोग्य मित्रांची नेमणूक आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. उपचाराबाबत, कागदपत्रांबाबत सर्व प्रकिया हे आरोग्यमित्र करण्यासाठी मदत करतात.

कार्ड काढण्यास कमी प्रतिसाद
जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजनेतून ५ लाख ८२ हजार पात्र लाभार्थी असले तरी आतापर्यंत केवळ १ लाख ७३ हजार नागरिकांनीच या योजनेच्या लाभासाठी आवश्यक असलेले कार्ड काढले आहे. याची टक्केवारी सुमारे ३० टक्के आहे.

सीएससी केंद्रांवरून कार्ड
जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून, ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून कार्ड काढले जात आहेत. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. संकेतस्थळाला भेट देऊन आपले यादीत नाव आहे का ते तपासावे किंवा १४५५५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
- डॉ. अशोक गायकवाड, जिल्हा समन्वयक, आयुष्यमान भारत योजना

बातम्या आणखी आहेत...