आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याख्यान:ब्राह्मण समाज कमी असला तरी नेत्यांना घरी पाठवण्याची ताकद; बीड शहरात परशुराम जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन

बीड15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शब्दांचा विपर्यास करून केवळ ब्राह्मण समाज टार्गेट केला जात आहे. राजकीय व्यासपीठावर राजरोसपणे टीका होत असेल तर आता उत्तर देण्याची वेळ आली आहे. ब्राह्मण समाज संख्येने कमी असला तरी तो तुम्हाला घरचा रस्ता दाखवू शकत. आता समाज जागृत झाला आहे त्यामुळे सार्वजनिक टीकाटिप्पणी करताना विचार करा असे सडेतोड बोल सुनावत पंडित अतुलशास्त्री भगरे यांनी राज्यात सुरू असलेल्या ब्राह्मण समाजावरील टीकेला प्रत्युत्तर दिले.

भगवान परशुराम जयंतीनिमित्त बीड शहरात सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. याच कार्यक्रमात ब्रह्मभूषण पुरस्कार वितरित करण्यात आला. या वेळी जन्मोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष अक्षय कुलकर्णी, अध्यक्ष गजानन जोशी कार्याध्यक्ष सचिन कुलकर्णी, सचिव भालचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी महंत अमृत आश्रम स्वामी महाराज, धुंडीराज शास्त्री पाटांगणकर, कालिदास थीगळे, सुरेश महाराज भोगे आदी उपस्थित होते. अतुलशास्त्री भगरे म्हणाले, जो आमच्या समाजाच्या विरोधात जाईल त्याला आम्ही कधीच माफ करणार नाहीत. काही राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजाविरुद्ध बोलण्याचा एक अजेंडाच लागू केला आहे, सॉफ्ट टार्गेट करून हा समाज वेगळा करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. ब्राह्मण सगळ्याच पक्षात आहेत. आम्ही जाहीरपणे सांगतो की जो आमच्या समाजाची बाजू धरेल त्याच्याच बाजूने आमचा समाज उभा राहील.

ब्राह्मण समाजानेदेखील आपल्या परंपरांचे पालन योग्यरितीने करायला हवे असे सांगितले. आमचा समाज स्वाभिमानी आहे जे चुकीचे ते चुकीचेच म्हणणारा हा समाज आहे. शस्त्र आणि शास्त्रात निपुण असणारा ब्राह्मण समाज आहे हे लक्षात घ्यावे. बीडमध्ये प्रत्येक वर्षी असा भव्य कार्यक्रम आयोजित करून समाज संघटित करण्याचा प्रयत्न करावा असे सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमास बीड शहरातील ब्राह्मण समाजातील नागरिकांची उपस्थिती होती.

वे.शा.सं. सुरेश महाराज भोगे यांना वेदभूषण पुरस्कार प्रदान
यावेळी जयंत उत्सव समितीच्या वतीने बीड शहरातील सुरेश महाराज भोगे यांना अतुलशास्त्री भगरे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत वेदभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना महंत अमृताश्रम स्वामी यांनी ब्राह्मण समाजाला संघटित करून बलशाली करण्याची गरज आहे. समाजाचे रक्षण करण्यासाठी ब्राह्मण तरुणांनी पुढाकार घ्यायला हवा असे सांगून त्यांनी संघटित व्हा,संघर्ष करा, भयमुक्त व्हा असा सल्ला दिला

बातम्या आणखी आहेत...