आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाली:64 गावांतील दीड हजार निराधारांच्या पोटापाण्याचा प्रश्न निघणार निकाली

रवी मठपती | अंबाजोगाई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्याही निराधार व्यक्तीचा उपासमारीमुळे मृत्यू होऊ नये म्हणून अंबाजोगाई येथील मानवलोक संस्थेने सहा वर्षांपूर्वी तृप्ती उपक्रमात ज्येष्ठ निराधारांसाठी सुरुवातीला पाच गावांत स्वयंपाकघर सुरू केले. शासनाकडून धान्य मिळेल किंवा शिधा मिळेल या आशेवर न बसता सुरू करण्यात आलेल्या अशा स्वयंपाकघराची संख्या गरजेनुसार वाढत गेली. बीडसह लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या ३६ स्वयंपाकघरे सुरू असून त्यातून ५०० निराधारांना मोफत जेवण मिळत आहे. नव्याने ६४ गावांत ६४ स्वयंपाकघरे सुरू होणार असून यातून दीड हजार ज्येष्ठ निराधार दाेन वेळा पोटभर जेवून तृप्तीचा ढेकर देणार आहेत.

मानवलोक संस्थेने २००६ मध्ये सुरुवातीला ज्येष्ठ निराधारांसाठी सहा स्वयंपाकघरे सुरू केली. यातून निराधारांना दोन वेळचे जेवण पोटभर मिळू लागले. ही व्यापकता वाढत वाढत बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईसह केज, धारूर तालुक्यात सध्या अशा स्वयंपाकघराची संख्या २९ वर गेली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा, लोहारा व लातूर जिल्ह्यातील सारसा येथे एकूण ७ स्वयंपाकघरे असून एकूण ३६ गावांतील स्वयंपाकघरांतून ५०० ज्येष्ठांना दोन वेळचे जेवण मिळत आहे. आता गावागावांतून अशा स्वयंपाकघरांची मागणी वाढू लागल्याने आणखी ६४ ठिकाणी नव्याने स्वयंपाकगृहे सुरू होणार आहेत. मानवलोकचे दिवंगत कार्यवाह डाॅ. द्वारकादास लोहिया यांच्या संकल्पनेमधून सध्या त्यांचे सुपुत्र अनिकेत लोहिया हे सामाजिक उपक्रम राबवत आहेत.

वर्षाकाठी ७५ लाखांचा खर्च
२०१६ मानवलोककडून अंबाजोगाई तालुक्यातील सोनवळा, येल्डा, मोरफळी, पाटोदा व केज तालुक्यातील पळसखेडा या पाच गावांतून स्वयंपाकघर सुरू करण्यात आले होते. स्वयंपाकघर चालवण्यासाठी ज्या महिला निराधार, परित्यक्ता, विधवा महिला यांना प्राधान्य देण्यात येत आहे. यातून १०० महिलांना वर्षभरासाठी रोजगार मिळत आहे. सध्या ३६ स्वयंपाकघरे चालवण्यासाठी मानवलोकला वर्षाकाठी ७५ लाख रुपये एवढा खर्च येतो. प्रत्येक व्यक्तीला दोन वेळचे जेवण देण्यासाठी महिन्याला तेराशे वीस रुपये खर्च लागत आहे.

दानशूरांच्या मदतीतून चालतो खर्च
ज्येष्ठ निराधारांसाठी सुरू करण्यात आलेल्या तृप्ती उपक्रमातील स्वयंपाकघराचा खर्च सेवाभावी संस्था, देणगीदार, गाव लोकवाटा, दानशूर व्यक्तीच्या मदतीतून केला जात आहे. उपक्रमातील ज्येष्ठांना हिवाळ्यात स्वेटर, मफलर, शाल असे उबदार कपडे पुरवण्यात येतात, दिवाळीला ज्येष्ठ निराधारांना घरपोच फराळ दिला जात आहे.

कशासाठी सुरू केला उपक्रम ?
६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठांना काही ठिकाणी त्यांच्या कुटुंबांकडूनच सांभाळले जात नाही. अशा ज्येष्ठांना दोन वेळचे जेवणही मिळत नाही. काही ज्येष्ठांना शारीरिक व्याधींमुळे कुठलाही आर्थिक आधार नसतो. शरीर थकले असल्याने काम होत नाही म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला. जेवणातून कसा सकस आहार मिळेल याची दक्षता घेतली जाते.

निराधारांची उपासमार थांबवली
कोणत्याही निराधार व्यक्तीचा उपासमारीमुळे मृत्यू होऊ नये म्हणून हा आमचा उपक्रम सुरू असून ज्या निराधार व्यक्तींचे वय ६५ हून अधिक आहे अशा ज्येष्ठ निराधारांसाठी गावात किचन उभे करण्यात असून त्यामुळे निराधार व्यक्तींची उपासमार थांबली असून दोन वेळचे चांगल्या पद्धतीचे पोटभर जेवण मिळत आहे.
-अनिकेत लोहिया, कार्यवाह, मानवलोक संस्था, अंबाजोगाई

बातम्या आणखी आहेत...