आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजप पक्षाने मला कोणतेही पद दिले नाही तरी मी पक्षाचे प्रामाणिकपणे काम करत आहे आणि या पुढेही करत राहणार. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत बीड जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवणार असल्याचे विश्वास पंकजा मुंडे यांनी आष्टी येथील कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीत भाजपने डावलल्यांनतर पंकजा मुंडे यांनी मौन बाळगले होते. दरम्यान, मंगळवारी आष्टी येथील कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आष्टी येथे लक्ष्मी लॉन्सवर मंगळवारी सायंकाळी ४ वाजता आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या.
या वेळी व्यासपीठावर आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सविता गोल्हार, नगराध्यक्ष पल्लवी धोंडे, युवा नेते जयदत्त धस, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस डॉ. अजय धोंडे, रंगनाथ धोंडे, उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे, नगरसेवक सुनील रेडेकर, जिया बेग, भारत मुरकुटे, किशोर झरेकर, अक्षय धोंडे, शेख शरीफ, दादासाहेब गर्जे, गणेश शिंदे आदी उपस्थित होते.
या वेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, मी आज छोटेखानी बैठकीला आले होते. परंतु, या बैठकीचे रूपांतर मेळाव्यात झाले. हे पाहून मला भाजपची ताकद कळाली. आगामी निवडणुकीत मी स्वत: लक्ष घालणार असून प्रत्येक गटात माझी स्वत:ची कोअर कमिटी असणार आहे. जिल्हा परिषद ताब्यात आणण्यासाठी तुम्ही एकजुटीने तयार राहा, असे आवाहन पंकजा यांनी केले. सूत्रसंचालन माउली जरांगे यांनी केले.
‘त्या’घोषणेने हसू अन् डोळ्यात पाणी
कार्यकर्ता मेळावा सुरू असताना भाजप कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे या महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अशी घोषणा दिली. ज्याने मेळाव्यात घोषणा दिली. त्याला व्यासपीठावरील सर्वांनी सगळे गप्प बस रे सांगितले. त्या वेळी मला अगोदर हसू आले, परंतु हे प्रेम पाहून माझ्या डोळ्यातून पाणी आले असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
स्वागतासाठी २५ फूट हार
विधान परिषदेची उमेदवारी डावलल्यांनतर प्रथमच आष्टीत आलेल्या पंकजांचे जोरदार स्वागत केले. भाजप कार्यकर्ता मेळाव्यात पोकलेनच्या सहाय्याने २५ फुटांचा हार घालून पंकजांचे आमदार धस यांनी स्वागत केले.
पंकजा मुंडे माफियाराज म्हणाल्या यात गैर काय?
^जिल्हा नियोजन समितीत अंदाधुंदी कार्यक्रम सुरू आहे. फक्त सत्ताधारी लोकांनाच कामे मिळाली पाहिजेत, अशी भूमिका पालकमंत्र्यांची आहे. पंकजाताई जिल्ह्यात माफियाराज आहे म्हणाल्या त्यात गैर काय?
-सुरेश धस, आमदार, भाजप.
धसांमुळे माजी आमदार झालो, मलाच नेहमी दगाफटका
पाच वर्षांपासून मी आणि सुरेश धस आम्ही दोघे एकत्र मिळून भाजपचे काम करत आहोत. आजपर्यंत मलाच नेहमी दगाफटका झालेला आहे. धसांमुळेच मी माजी आमदार झालो असे भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले. तर आम्ही दोघे एक झालोत. परंतु, नुसतं तनाने एक होऊन चालणार तर मनाने एकत्र आले पाहिजे. यासाठी पंकजाताईंनी हाती दंडुका घेतला पाहिजे, असे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी भाषणात माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिले.
पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका एकत्र येऊन लढवणार असल्याची कबुली धोंडे-धस यांनी जाहीरपणे दिली. या वेळी पंकजांनी दोघांनाही सबुरीचा सल्ला देत तुम्ही सध्याची समोर असलेली निवडणूक अगोदर बघा, नंतर पायात पाय असा सबुरीचा सल्ला पंकजा मुंडे यांनी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.