आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:करुणा शर्मा प्रकरणी नाट्याचा दुसरा अंक; ऑडिओ क्लिप व्हायरल, चालकावर गुन्हा

बीड/अंबाजोगाई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी परळीत दाखल झालेल्या करुणा शर्मा प्रकरणात नाट्यमय घडामोडी दुसऱ्या दिवशीही कायम राहिल्या. एक आॅडिओ क्लिप सोमवारी व्हायरल झाली. या क्लिपमधील आवाज शर्मा यांचा असल्याचा दावा केला जात आहे. दुसरीकडे, शर्मा यांच्या वाहनात सापडलेल्या पिस्तूल प्रकरणात वाहनचालकाविरोधात गुन्हा नोंदवला गेला. सोमवारी करुणा शर्मा यांना अंबाजोगाई न्यायालयात हजर केले गेले. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. अरुण मोरे या सहकाऱ्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

धनंजय मुंडेंसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या करुणा शर्मा रविवारी थेट परळीत दाखल झाल्या होत्या. वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना स्थानिक महिला कार्यकर्त्यांनी विरोध केल्याने गोंधळ निर्माण झाला. त्यांच्या वाहनात पिस्तूलही सापडले होते. त्यानंतर पिस्तूल ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दरम्यान, विशाखा घाडगे या महिलेच्या तक्रारीवरून करुणा शर्मा व अरुण मोरे यांच्या विरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न व अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंद झाला होता.

अपने को तो रायता खडा करने का है !: करुणा यांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियात सोमवारी व्हायरल झाली. यात त्या, समोरच्या व्यक्तीशी फोनवर बोलत आहेत. तो व्यक्ती करुणांना धनंजय मुंडेंच्या वकिलांच्या पत्राबाबत माहिती देत आहे. अशा प्रकारे पत्रकार परिषद घेतल्यास तो न्यायालयाचा अवमान होईल, असे तो सांगत आहे. यावर करुणा या “अपने को तो रायता खडा करने का है, पैसो के लिए प्रेशर तयार करना है’ असे म्हणताना दिसत आहेत. मात्र, ऑडिओतील आवाज करुणा यांचाच आहे की इतर कुणाचा, हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

चालकावर गुन्हा, मालकाचा शोध : करुणा यांच्या वाहनात सापडलेल्या पिस्तूल प्रकरणात वाहनचालक दिलीप पांडे याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला. तर, या वाहन मालकाचा शोध पोलिस घेत असल्याचे पोलिस अधीक्षक आर. राजा यांनी सांगितले. करुणा व अरुण मोरेंनी चाकूने हल्ला करून महिलेला जखमी केले. ही जखम मोठी असल्याचे प्रमाणपत्र डॉक्टरांनी दिले. त्यामुळे ३०७ कलम लावल्याचे एसपी आर. राजा यांनी सांगितले तर, दुसरीकडे स्वाराती रुग्णालयाचे अधिष्ठाता भास्कर खैरे यांनी आम्ही असे कुठलेही प्रमाणपत्र दिले नाही, रुग्ण सध्या उपचाराखाली आहे. सुटीनंतर प्रमाणपत्र दिले जाते, असे सांगितले. त्यामुळे एसपींचा दावा किती फोल आहे हे समोर आलेच शिवाय पोलिसांच्या भूमीकेवरही प्रश्नचिन्ह अधिक गडद झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...