आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी शासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात असून याचाच एक भाग म्हणून शिक्षण विभागाकडून सध्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. पाटोदा तालुक्यात आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणात एकही शाळाबाह्य विद्यार्थी आढळला नसल्याचा दावा शिक्षण विभागाकडून केला जात असला तरीही ३० दिवसांपेक्षा अधिक काळ गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र १० आहे. त्यामुळे हे विद्यार्थीदेखील शाळाबाह्य असल्याचे दिसून येत आहे. अशा विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सध्या व्यापक प्रयत्नांची गरज आहे.
कोरोना काळात वेगवेगळ्या क्षेत्रांना फटका बसला. यामध्ये शिक्षण क्षेत्राचाही समावेश आहे. विद्यार्थी व शाळेची थेट असलेली नाळ तुटल्याने झालेल्या दुराव्यामुळे विद्यार्थी शाळेपासून दुरावले जाऊ शकतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पाटोदा तालुक्यात शिक्षण विभागाकडून सर्वेक्षण केले जात आहे. यामध्ये आतापर्यंत कायमस्वरूपी शाळाबाह्य एकही विद्यार्थी आढळला नसल्याचा दावा शिक्षण विभागाकडून केला जात आहे. मात्र असे असले तरीही तीस दिवसांपेक्षा अधिक काळ गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तीस असल्यामुळे हे विद्यार्थी देखील शाळाबाह्य ठरत आहेत. अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून तालुक्यातील विविध ठिकाणी दुर्गम भाग मुख्यतः ऊसतोड कामगारांचे वस्त्या वीट भट्टी, भटक्या जमातींच्या रहिवासी पाढे तसेच प्रत्येक ठिकाणी सर्वेक्षण करण्यात येत आहे. ज्या ज्या ठिकाणी तीस दिवसांपेक्षा अधिक काळ गैरहजर विद्यार्थी आहेत तेदेखील शाळाबाह्य समजले जात असून या विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क करून त्यांना एकदा शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अनेक ठिकाणी पालक रोजंदारीसाठी स्थलांतरित झाल्याने विद्यार्थ्यांचा शिक्षणावर परिणाम झाला आहे. दरम्यान, मागील काही दिवसात प्रभारी गटशिक्षण अधिकारी धनंजय बोंदार्डे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळाबाह्य मुले शोधमोहीम तालुक्यात राबवण्यात येत आहे. या मोहिमेत गैरहजर शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोधघेऊन त्यांना शाळेत दाखल करून घेण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे.
नागरिकांच्या सहकार्याचेही शिक्षण विभागाचे आवाहन
पाटोदा तालुक्यातील विविध भागांत सद्या प्रशासकीय स्तरावर शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनाही आपल्या आसपास, परिसरात जर कुठे शाळाबाह्य मुले आढळून आली तर तातडीने नजीकच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत किंवा शिक्षण विभागास संपर्क करावा, जेणेकरून संबंधित विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहणार नाही, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाचे प्रयत्न सुरू, खबरदारी घेत आहोत
शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण सुरु आहे. पाहणी करून घेऊन शाळेच्या परिसरातील सर्वेक्षण करावे, अशा सूचना आहेत. तालुक्यात एकही मूल शाळाबाह्य राहणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे. सजग नागरिकांनीही शाळाबाह्य ठरतील अशी मुले असल्यास शिक्षण विभागास कळवावे. प्रशासनाच्या वतीने आवश्यक ते प्रयत्न पूर्ण क्षमतेने केले जात आहेत.
धनंजय बोंदार्डे, प्रभारी गट शिक्षणाधिकारी, पाटोदा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.