आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खा. प्रितम मुंडे प्रकरण:14 जिल्हा परिषद सदस्यांसह 150 पंकजा समर्थकांचे राजीनामे; मुंडेंच्या मुंबईतील आजच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष

बीडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्हाध्यक्षांच्या पत्नीनेही दिला राजीनामा

बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात डावलण्यात आल्याने बीड जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून भाजपच्या पंचायत समिती सदस्यांपासून नगरसेवकांपर्यंत पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र सुरू केले आहे. दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे सोमवारपर्यंत १५० राजीनामे आले असून ते मुंबईला गेले आहेत. मंगळवारी भाजप नेत्या पंकजा मुंडे व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी मस्के हे चर्चा करणार आहेत. मंगळवारी पंकजा यांच्या वरळी येथील कार्यालयात भाजप पदाधिकाऱ्यांची व्यापक बैठक होणार असून पंकजा मुंडे या पदाधिकाऱ्यांशी बोलून काय निर्णय घेतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये डावलण्यात आल्याने बीड जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू केले आहे. मागील तीन दिवसांच्या काळात जिल्ह्यात १४ जिल्हा परिषद सदस्य, ३५ पंचायत समिती सदस्य, ४० नगरसेवक, १६ बाजार समिती सदस्य, बीड जिल्ह्यातील भाजपचे अकरा मंडळ अध्यक्ष या शिवाय शिरूर पंचायत समिती उपसभापतींसह केज, पाटोदा आणि गेवराई येथील पंचायत समितीच्या सभापतींनी आपल्या पदांचे राजीनामे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.

खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपदापासून डावलण्यात आल्याने बीड जिल्ह्यात भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून आणखी काही राजीनामे येण्याची शक्यता असल्याचे पत्र भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लिहिले असून सोमवारी जिल्ह्यातील एकूण १५० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन जिल्हाध्यक्ष मस्के मुंबईला पोहोचले असून मंगळवारी मस्के भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन यावर चर्चा करणार आहेत.

पंकजा यांच्याशी चर्चा करणार
प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत होते मी, डॉ. प्रीतम मुंडे या मंत्री व्हाव्यात परंतु कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. यावर पंकजांनी प्रत्येकाला संयमाचे आवाहन केले आहे. सध्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. जिल्ह्यातील १५० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे स्वीकारले असून उद्याच्या बैठकीत आमच्या नेत्या पंकजा मुंडे
यांच्याशी चर्चा करणार आहे. - राजेंद्र मस्के, जिल्हाध्यक्ष, भाजप​​​​​​​

मुंबईतील वरळी येथील कार्यालयात आज पंकजा मुंडे यांची बैठक होणार आहे.
मुंबईतील वरळी येथील कार्यालयात आज पंकजा मुंडे यांची बैठक होणार आहे.

वरळी कार्यालयात बैठक
भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना मोदींच्या मंत्रिमंडळात डावलण्यात आल्याने बीडसह राज्यातील नाराज पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले असून या पार्श्वभूमीवर वरळी येथील कार्यालयात मंगळवार, १३ जुलै २०२१ रोजी दुपारी बारा वाजता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत असून या बैठकीत पंकजा मुंडे आता शिवसेनेत प्रवेशाचा निर्णय घेतात की भाजपमध्ये राहतात याकडे लक्ष लागले आहे.

जिल्हाध्यक्षांच्या पत्नीनेही दिला राजीनामा
बीडचे भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पत्नी जयश्री मस्के या लिंबागणेश जिल्हा परिषद गटाच्या भाजपच्या सदस्या असून त्यांनीही नाराजी व्यक्त करत राजेंद्र मस्के यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.

बातम्या आणखी आहेत...