आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनास्थेचा बळी:जिवंतपणीच्या यातना मृत्यूनंतरही कायम; शेतकऱ्याचा मृतदेह उंदराने कुरतडला

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हा रुग्णालयात नातेवाइक गर्दी करून आक्रमक झाले होते. (इन्सेट) मृत शेतकरी अर्जुन सोळंके. - Divya Marathi
जिल्हा रुग्णालयात नातेवाइक गर्दी करून आक्रमक झाले होते. (इन्सेट) मृत शेतकरी अर्जुन सोळंके.
  • पेटवून घेतलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू, तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा झाला नोंद

वीस गुंठे जमीन कमी दाखवून मावेजा न दिल्याने जमीन परत द्यावी किंवा मावेजा द्यावा यासाठी आधी आई राधाबाई यांनी दीड तप संघर्ष केला, त्यांच्या निधनानंतर मुलगा अर्जुन यानेही संघर्ष कायम ठेवला. तहसील ते मंत्रालय अशा फेऱ्या मारताना जिवंतपणी मरणयातना भोगणाऱ्या अर्जुन सोळंके यांनी मंगळवारी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात पेटवून घेतले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मात्र, मृत्यूनंतरही यातनांनी त्यांची पाठ सोडली नाही. शवागारात उंदराने मृतदेह कुरतडल्याचा आरोप नातेवाइकांनी केला.

तत्पूर्वी सोळंकेंच्या आत्महत्येला जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंद होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली. सुमारे १२ तासांनंतर उपजिल्हाधिकारी भूसंपादन, उपअधीक्षक भूमी अभिलेख आणि कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांच्यावर गुन्हे नाेंद झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. सरकारी अनास्थेने अर्जुन सोळंके यांचा बळी घेतला. अर्जुन कुंडलिक साळुंके (३५, रा. पाली, ता. बीड) या शेतकऱ्याची २० गुंठे जमीन पाटबंधारे विभागाने संपादित केली होती. बिंदुसरा प्रकल्पाच्या कर्मचारी वसाहतीसाठी ही जमीन सन १९५६ मध्ये संपादित झाली. परंतु यातील काही जमिनीचा मावेजा हा दुसऱ्याच व्यक्तीला गेला. नियमानुसार मावेजा मिळावा किंवा जमीन परत मिळावी यासाठी अर्जुन व त्यांची आई राधाबाई हे सन २००७ पासून प्रशासनाशी संघर्ष करत होते. पाटबंधारे विभाग, भूमी अभिलेख, भूसंपादन, जिल्हाधिकारी कार्यालय ते मंत्रालय अशा फेऱ्या मारताना दीड तपानंतर राधाबाईंचे निधन झाले. त्यानंतर अर्जुन साळुंके यांनी मंगळवारी पाटबंधारे कार्यालयासमोर दुपारी अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले.

राधाबाईंचाही आत्मदहनाचा प्रयत्न ‘दिव्य मराठी’ने समोर आणले होते प्रकरण
या प्रकरणात अर्जुन यांच्या आई राधाबाई यांनी १ ऑगस्ट २०१८ रोजी मंत्रालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. राधाबाई व अर्जुन या मायलेकरांच्या लढ्याचा संघर्ष ‘दिव्य मराठी’ने २ ऑगस्ट रोजीच्या अंकात सर्वात आधी समोर आणला हाेता. यानंतर राधाबाईंनी शिवसेनेच्या दुष्काळी मेळाव्यात उद्धव ठाकरेंची भेट घेत हा प्रश्न मांडला तेव्हा प्रश्न सोडवू असे आश्वासन त्यांनी दिले. आज ते मुख्यमंत्री असताना अर्जुन यांच्यावर आत्मदहनाची वेळ आली.

नातेवाइक आक्रमक, पोलिस बंदोबस्त
सोळंकेंच्या मृत्यूनंतर त्यांचे नातेवाइक आक्रमक झाले होते. सोळंकेंच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदवा तरच मृतदेह ताब्यात घेऊ, अशी भूमिका त्यांनी घेतली. यामुळे जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण झाले होते. मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

तीन अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंद, पण नावांचा उल्लेख नाही
या प्रकरणी मृत अर्जुन यांचा मुलगा अविनाश सोळंके याच्या तक्रारीवरून पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी आणि भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक या तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला. दरम्यान, या अधिकाऱ्यांची नावे मात्र पोलिसांनी घेतलेली नाहीत केवळ पदांवर गुन्हा नोंद केला गेला.

१२ तासांनंतर झाले अंत्यसंस्कार
गुन्हा नोंद झाल्यानंतर नातेवाइकांनी अर्जुन यांचा मृतदेह ताब्यात घेतला. सुमारे १२ तासांनंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. दरम्यान, शवागारात त्यांचा मृतदेह उंदराने काही ठिकाणी कुरतडल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. या प्रकरणीही चौकशी केली जाणार आहे.

- जमीन किंवा मावेजाच्या मागणीसाठी आधी आईने दीड तप संघर्ष; तिच्या मृत्यूनंतर मुलाने घेतले होते पेटवून - पालीतील नातेवाइकांचा आरोप, दोषी अधिकाऱ्यांंवर गुन्हा नोंदवण्यासाठी घेतला आक्रमक पवित्रा - २ आॅगस्ट २०१८ रोजी ‘दिव्य मराठी’ने राधाबाई व अर्जुन सोळंके यांचा संघर्ष मांडला होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser