आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव विशेष:13 गावांसाठी अडीचशे वर्षांपासून “एक गाव एक गणपती’ची परंपरा, गौरी बरोबरच गणेशाचे विजर्सन

लिंबागणेश (जि.बीड)एका वर्षापूर्वीलेखक: दिनेश लिंबेकर
  • कॉपी लिंक
  • मयूरेश्वराला भक्तांची लागलेली दृष्ट बंबाळ आरतीने काढण्याची लिंबागणेशमध्ये प्रथा

बीड जिल्ह्यातील लिंबागणेश गावात मागील २५० वर्षांपासून तेरा गावांसाठी एक गाव एक गणपतीची परंपरा जोपासली जात आहे. कुंभारी मातीपासून तयार होणारा हा गणपती मोरावर आरूढ असल्याने याला मयूरेश्वर म्हणतात. हे बालाघाटचे श्रद्धास्थान आहे. गौरी बरोबरच गणेशाचे विजर्सन होत असल्याने इथला गणेशोत्सव पाच दिवसांचा आहे. गावात सार्वजनिक ठिकाणी गणपती बसवला जात नाही हेच या गावातील वैशिष्ट. विशेष म्हणजे गौरी विसर्जनाच्या आदल्या दिवशी मयूरेश्वर गणेशाची दृष्ट काढण्याची परंपरा प्राचीन आहे. भालचंद्र गणपतीमुळे राज्यात प्रसिद्ध असलेल्या सहा हजार लोकसंख्येच्या लिंबागणेशच्या गणेशोत्सवाला पेशवेकालीन वारसा आहे. २५० ते ३०० वर्षांपासून येथे “एक गाव एक गणपती’ परंपरा आजतागयत सुरू आहे. सतराव्या शतकाच्या अखेरीस गणेश रंगनाथ कानिटकर हे कोकण सोडून मराठवाड्यात आले. तेव्हा बाळाजी विश्वनाथ यांच्याबरोबर कोकणातून मराठवाड्यात जे कोकणस्थ आले, त्यांत कानिटकरांचा उल्लेख आहे.

कानिटकरांनी निझाम आणि पेशव्यांकडून इनाम खरेदी करून सनदा मिळवल्या. थोरले माधवराव पेशवे यांच्याकडूनही या गावी त्याकाळी पुष्पवाटिका मिळवली. पुढे व्यंकोजी गणेश कानिटकर यांनी परांडा तालुक्यातील विडे, बीड तालुक्यातील मांजरसुंभा, वानगाव, कळसंबर या गावांचे इनाम मिळवले. व्यंकोजींनी या गावात एका वाड्याचे बांधकाम केले. त्याच सरकार वाड्यात गणेशोत्सवात गणेश चतुर्थीला मयूरेश्वराची प्रतिष्ठापणा होते. वंशपरंपरेने मूर्तिकलेचा वारसा माणिकराव कानिटकर यांच्या घरात असून सध्या त्यांचा मुलगा उमेश कानिटकर यांना मूर्ती तयार करण्यासाठी मुळूकवाडी येथील महोदव आहेरकर हे कुंभार माती पुरवतात. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी मयूरेश्वराचे काम सुरू होऊन श्रावण वैद्य त्रयोदशीला पूर्ण होते. त्यांनतर पोळ्याच्या दुसऱ्या दिवसापासून रंगकाम सुरू होते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीस गणेशाची शोडषोपचार पूजा करून सरकारवाड्यात गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते.

गौरी विसर्जनाच्या आदल्या दिवशी या मयूरेश्वराची रात्री बारा वाजता १६ ज्योती व एक मुख्य दिवा एका कलशावर ठेवून गणपतीची दृष्ट काढण्यासाठी गणेश मूर्तिकाराच्या हस्ते बंबाळ आरती केली जाते. बंबाळ आरती हा एक जागर आहे. मोरगाव, पाली, रांजणगाव या अष्टविनायकाप्रमाणे इथे द्वाराची परंपरा आहे. या क्षेत्राचे माहात्म्या मोठे आहे. गणेशोत्सवाच्या काळात मयूरेश्वराच्या दर्शनासाठी बीड जिल्ह्यातून हजारो लोक येऊन नवस फेडतात त्यामुळे मयूरेश्वराला दृष्ट लागते. ही दृष्ट काढण्यासाठीच विसर्जनाच्या आदल्या दिवशी रात्री बंबाळ आरती केली जाते, असे येथील गणेशभक्त रंजन कानिटकर यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

कसा असतो हा मयूरेश्वर गणपती ?
कुंभारी मातीपासून तयार होणाऱ्या गणेशमूर्तीच्या टोपाला सोनेरी, डोक्यावर काळा, कमरेवर शेंदरी, हातापायांना गोरा रंग दिला जातो. दोन हातांपैकी उजव्या हातात त्रिशूल तर डाव्या हातात परशू असतो. मूर्तीचा खालचा उजवा हात हा अभय देणारा असतो. डाव्या हातात मोदक, पायात घागऱ्या, कमरेला साखळ्या, हातात गोठ, दोन्ही पायांत चांदीच्या पादुका, कानात कुंडले. तर, वाहन असलेल्या मोराच्या तोंडात मोत्याची माळ आणि डोक्यावर तुरा अशी ही गोजिरी मयूरेश्वराची मूर्ती असते.

राजेशाही थाटात निघते मिरवणूक
गौरी विसर्जनाच्या दिवशी मूळ नक्षत्र लागल्यानंतरच दुपारी दीड वाजता मुख्य आरतीनंतर मयूरेश्वराची विसर्जन मिरवणूक सागवानी पालखीतून सुरू होते. छत्री, चौरी, अब्दगिरी, चामर, ध्वज, दंड असा राजेशाही थाट व टाळ मृदंग अशा पारंपरिक वाद्याच्या गजरात ही मिरवणूक सुरू असते. मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे मिरवणूक काढण्यात आली नव्हती. गणपतीच्या मिरवणुकीसमोर गावातील परीट बांधव धोतराच्या पायघड्या घालतात. गजरात चंद्रपुष्कर्णी तीर्थावर गणेशाला निरोप दिला जातो.

बातम्या आणखी आहेत...