आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्पादन शुल्क विभागातील मद्यधुंद अवस्थेतील अधिकाऱ्याने नशेत कार चालवून दुचाकी, कारला पाठीमागून धडक देत दोघांना जखमी केल्याची घटना केज-मांजरसुंबा रस्त्यावरील मस्साजोगजवळ घडली. याची माहिती मिळताच पोलिसांनी गाडी अडवून या मद्यपी अधिकाऱ्यास ठाण्यात आणले.
लातूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातील एक अधिकारी हा ५ मे रोजी मित्राचे लग्न आटोपून नशेत तर्र असलेल्या अवस्थेत कार (एमएच ०४ एच यू ५७५७) चालवत होता. केज-मांजरसुंबा रस्त्यावर मस्साजोगजवळ या मद्यपी अधिकाऱ्याने एका दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यात दुचाकीस्वार अनमोल जोशी व श्रेया जोशी (दोघे रा. लातूर) हे जखमी झाले. त्यानंतर पुढे कारला (एमएच १४ डीए ६९९१) या महाभागाने मागून धडक दिली.
यात त्यांच्या कारचे नुकसान झाले. मात्र कारचालक भरत साळुंके, परसराम हाके, त्यांची बहीण विद्या हाके हे तिघे बालंबाल बचावले. दरम्यान, दोन्ही वाहनांना धडक देऊन दारूच्या नशेत तर्र असलेला हा दारूबंदी अधिकारी पळून जात असल्याची माहिती केज पोलिसांना मिळताच सहायक फौजदार वालवडकर, जमादार आश्रुबा मुरकुटे, धनपाल लोखंडे, दिलीप गित्ते, उमेश आघाव, शेख मतीन यांनी पाठलाग करून केज येथील कळंब चौकात त्यांची कार अडवली. मद्यधुंद अवस्थेतील मद्यपी अधिकाऱ्यास ठाण्यात आणले होते. मात्र, केज पोलिसांत उशिरापर्यंत गुन्हा दाखल नव्हता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.