आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ग्रामसेवक म्हणतात, टँकरचा प्रस्ताव दिला; बीडीओ म्हणतात, प्रस्ताव आलाच नाही, आसोलाकरांचे पाण्यासाठी हाल कायम

धारूर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे बीड जिल्ह्यात उन्हाचा पारा ४३ अंश सेल्सियसवर पोहोचला असताना दुसरीकडे धारूर तालुक्यातील आसोला गावातील महिला व ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. गावातील महिलांना ३५ फूट खोल विहिरीत उतरून पाणी भरावे लागत आहे. येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने गावात टँकर सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव धारूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना पाठवला असताना गटविकास अधिकारी राजू कांबळे यांनी हा प्रस्ताव माझ्याकडे आलाच नसल्याचे सांगितले. तीन हजार लोकसंख्येच्या आसोला गावात पाणीपुरवठ्याच्या चार योजना राबवूनही २५ वर्षांपासून पाणीटंचाई आहे. लोकसंख्येच्या तुलनेत गावात पाणी नाही. उन्हाळा आला की गावात पाण्याच्या प्रश्न गंभीर बनतो.

सध्या गावातील ३५ फूट विहिरीत उतरून महिलांना वाटी-वाटीने पाणी भरावे लागत आहे. काही ग्रामस्थ शिवारातून सायकलद्वारे पाणी आणतात. येथील ग्रामसेवक एम. बी. डांगे यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता त्यांनी गावासाठी टँकरसाठीचा प्रस्ताव पंचायत समितीला सोमवारी सादर केल्याचे सांगितले. दरम्यान, धारूर येथील गटविकास अधिकारी राजू कांबळेंशी संपर्क साधला असता त्यांनी पाणीटंचाईबाबत ग्रामसेवकास पत्र दिले असून टँकरचा प्रस्ताव पंचायत समितीस मिळाला नसल्याचे सांगितले. यावरून अधिकारी-कर्मचारी यांच्यात बेबनाव असल्याचे दिसून येत आहे.

ईश्वर मुंडे यांनी दिली आसोला गावाला भेट
आसोला येथील पाणीटंचाईचे वृत्त दिव्य मराठीत मंगळवारी प्रकाशित होताच राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस ईश्वर मुंडे यांनी या गावात दुपारी भेट दिली. गावात टँकर सुरू करण्याबाबत गटविकास अधिकाऱ्यास दूरध्वनीवरून सूचना दिली.

टँकर मागणीचा प्रस्ताव सायंकाळी दिला
आसोला येथील पाणीटंचाईबाबत सोमवारी ग्रामसेवक एम. बी. डांगे यांना पत्र दिले. परंतु, मला पत्र का दिले म्हणून डांगे यांनी माझ्याबरोबर हुज्जत घातली. सायंकाळी पाच वाजेदरम्यान टँकर मागणीचा प्रस्ताव त्यांनी सादर केला आहे.
-एस. एस. पवार, विभागप्रमुख, पाणीटंचाई विभाग, पंचायत समिती.

बातम्या आणखी आहेत...