आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या म्हणून माहेरी बाळंतपणासाठी आलेल्या महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी खडतर रस्त्याचा सामना करावा लागला. महिलेला चिखल तुडवत व गाडीबैलाने प्रवास करावा लागला. स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे उलटले तरी जळगाव मजरा आणि रुई यादरम्यानचा दोन किमीचा पक्का रस्ता नसल्याने नागरिकांवर ही वेळ नेहमीच येते.
गेवराई तालुक्यातील जळगाव मजरा ते रुई येथील दोन किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तर गावातील रस्त्याची वाट लागली आहे. नागरिकांना ये-जा करताना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. चिखल तुडवत चालावे लागत आहे. यामुळे गावातील आजारी रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यास कसरत करावी लागत आहे. या गावाला आतापर्यंत कधीच पक्का रस्ता मिळाला नसल्याने गावकऱ्यांचे हाल होत आहेत. दरम्यान, अर्चना गुंदेकर (रा. अंबासाळवी, ता.बीड) या बाळंतपणासाठी माहेरी जळगाव मजरा (ता. गेवराई) येथे आल्या. त्यांना गुरुवारी सकाळी प्रसूती कळा सुरू झाल्याने रुग्णालयात नेण्यासाठी धावाधाव सुरू झाली. मात्र गावाचा रस्ता एवढा अवघड झाला असून कोणतेही वाहन येते येण्यास तयार नाही. प्रसूतीच्या वेदना सुरू असताना काही ठिकाणी पायी चालावे लागले, तर अखेर त्यांना बैलगाडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रशासन-लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
या प्रकाराने गावातील लोकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. आणखी किती दिवस अशा रस्त्याचा सामना करावा लागेल? आता तरी लोकप्रतिनिधींनी जागे व्हावे व रस्त्याचे प्रश्न तत्काळ मार्गी लावावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.