आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिकता:सामाजिक क्षेत्रात धार्मिकता अजिबात असता कामा नये

अंबाजोगाईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक क्षेत्रात धार्मिकता नसावी. आधुनिकता ही माणसाच्या वर्तनातून दिसून येत असते. आधुनिकता ही खऱ्या अर्थाने धार्मिक संकटात अडकली आहे, असे मत औरंगाबाद येथील डाॅ. उमेश बगाडे यांनी व्यक्त केले.

येथील योगेश्वरी शिक्षण संस्था, कर्मचारी गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गणेश व्याख्यानमालेत ते ‘महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीची निष्पत्ती’ या विषयावर शनिवारी (ता. ३ सप्टेंबर) बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्था कोषाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव लोमटे होते. पढे बोलताना डॉ.बगाडे म्हणाले, सर्व संतांनी जातीविषमतेचा निषेध केला. समाज प्रबोधनाने मानवाला विकासाची कल्पना दिली. परंपरेपासून फारकत घेणे केवळ समाज प्रबोधनामुळे शक्य होत असते. जाती व्यवस्था मानवाने तयार केली असून जातीची मिमांसा इतिहासाच्या परिघात केली गेल्याचे दिसते. जन्मजात विषमता मोडणारी चौकट म्हणजे संत परंपरा होय. धर्मनिरपेक्षता जगाच्या पाठीवर महत्वाची ठरली आहे.

देशात धर्मनिरपेक्षतेचा विचार कायम गोंधळलेला राहिला. मुलगामी विचार झाला नाही, तो फक्त महात्मा फुले व डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी मांडण्याचा प्रयत्न केला. आधुनिकतेचे संकट धर्मनिरपेक्षेच्या परिघात अडकले आहे. सर्व सुधारणावादी लोकशाही या शासन चौकटीचा आग्रह धरतात. व्यक्तिस्वातंत्र्याशिवाय लोकशाही उभी राहू शकत नाही.महाराष्ट्रात बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे,गोपाळ गणेश आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे, डाॅ.भीमराव आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील इत्यादींनी समाजसुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले.

अनिष्ट सामाजिक रुढींविरुद्घ लढा दिला.असे मत डाॅ.उमेश बगाडे व्यक्त केले. प्रा.डॉ.रमेश सोनटक्के यांनी सूत्रसंचालन केले. माजी प्राचार्य डाॅ. रमेश सोनवळकर यांनी पाहुण्याच्या परिचय करून दिला. प्रा.सुनीता चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.कार्यक्रमाला योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे, उपाध्यक्ष ॲड.शिवाजीराव कराड, सहसचिव एस. के. बेळुर्गीकर, प्राचार्य डॉ.रमण देशपांडे आदी हजर होते.

गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान
आपणास राजकीय स्वातंत्र्य जरूर मिळालेले आहे. परंतु नागरिकांना स्वायत्तता मिळाली नाही. सामाजिक आणि आर्थिक लोकशाही देशात दिसत नाही.सामाजिक स्वातंत्र्याचा विकास झाला नसेल तर लोकशाही म्हणण्यास अर्थ उरत नसतो. त्यामुळे समाजात सामाजिक व आर्थिक लोकशाही दिसण्याची आवश्यका असल्याचेही याप्रसंगी डॉ.उमेश बगाडे यांनी सांगितले. यावेळी योगेश्वरी संस्था कर्मचारी व अंबाजोगाईतील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...