आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:वेळांसंदर्भात पत्र नसल्याने शिक्षकांमध्ये होता संभ्रम; आता शाळांची वेळ झाली सकाळी 8 ते 2 निश्चित

धारूर2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • कुठे 5 तास, कुठे 4 तास, तर काही ठिकाणी साडेतीन तास भरत होती शाळा

शाळेचे वेळांसंदर्भात शिक्षकांना वरिष्ठांचे कोणत्याही प्रकारचे पत्र नसल्यामुळे किती तास शाळा भरवायची यासंदर्भात शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. त्यामुळे १५ दिवसांपासून कुठे ५ तास, कुठे ४ तास तर काही ठिकाणी साडेतीन तास शाळा भरत आहेत. पालकांच्या तक्रारी गेल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी बुधवारी वेळांच्या बाबतीतील पत्र काढले असून सकाळी ८ ते २ ही वेळ निश्चित केली आहे. मागील दोन वर्षांच्या कालावधीमध्ये कोरोनामुळे शाळा बंद राहिल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. त्यानंतर दोन महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या आहेत.

विद्यार्थ्यांना पूर्वी दुपारी सुटी देण्यात येत होती. परंतु, या वर्षी कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. यामुळे पालकांमधून शाळा सुरू ठेवण्याची वेळ वाढवावी अशी मागणी पालकांनी केली होती. यातच अर्धा मार्च महिना गेला तरी शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना वेळेसंदर्भात पत्र दिले नसल्यामुळे किती वेळ शाळा सुरू ठेवावी, यासंदर्भात शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. काही ठिकाणी साडे आठ वाजता शाळा सुरू होते तर काही ठिकाणी नऊ, तर काही ठिकाणी साडेनऊ वाजता शाळा भरते. सध्या शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचे दिवस असतानाही शिक्षण विभागाचे नियंत्रण नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. धारूर तालुक्यातून पालकांच्या तक्रारी शिक्षणाधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर बुधवारी शाळांच्या वेळासंदर्भात सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढले असून १७ मार्चपासून सकाळी ८ ते २ ही शाळेची वेळ निश्चित केली.

आयुक्तांचे पत्र नसल्याने झाला उशीर
वेळेसंदर्भात प्रोसिडिंग आम्हाला मिळाले नाही. किमान सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत शाळा भरण्याची गरज आहे. आयुक्तांचे पत्र नसल्याने आम्हाला शाळेच्या वेळांसंदर्भातील पत्र काढण्यास उशीर झाला. -श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी, (प्राथमिक), जिल्हा परिषद.

बातम्या आणखी आहेत...