आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यांची शहराच्या सायगाव नाका परिसरातील अंबाजोगाई नागरी सहकारी पतसंस्था चोरांनी फोडून ५७ हजारांच्या चिल्लरसह दोन लाखांची रक्कम लांबवल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.
भाजपचे युवा नेते अक्षय मुंदडा हे अंबाजोगाई नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष असून शहरातील सायगाव नाका परिसरात स्व.मीनाताई ठाकरे चौकात या पतसंस्थेचे कार्यालय आहे. शुक्रवारी कामकाज आटोपल्यानंतर जमा झालेली २ लाख २ हजार ६६७ रुपयांची रक्कम कुलूपबंद कपाटात ठेवून कर्मचारी कार्यालय बंद करून घरी निघून गेले. शनिवारी पहाटे सव्वातीन वाजता कारमधून आलेल्या चोरांनी पतसंस्थेचे शटर उचकून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटाचे कुलूप तोडून आत ठेवलेली ५७ हजारांच्या चिल्लरसह दोन लाख २ हजार ६६७ रुपयांची रक्कम घेऊन चोरांनी पोबारा केला. शनिवारी सकाळी ६.३० वाजता ही चोरी उघडकीस आली, असे पतसंस्थेचे व्यवस्थापक रामलिंग सोनटक्के यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. अक्षय मुंदडा यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास पीएसआय कांबळे करत आहेत.
चोरटे सीसीटीव्हीत कैद
शहरातील अंबाजोगाई नागरी सहकारी पतसंस्थेसमोरील एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजमध्ये चोरटे कैद झाले आहेत. पहाटे ३.१५ वाजता कारमधून आलेल्या तीन चोरट्यांनी ही चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येत आहे. हे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे. तसेच पोलिसांना चोरट्यांच्या हातांचे ठसे मिळाले असून ठशांची शहानिशा सुरू आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.