आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:आष्टीच्या दिगंबर जैन मंदिरातून चोरट्यांनी सहा मूर्ती पळवल्या; मंदिर बंद असल्याने मध्यरात्री चोरांचे फावले, 20 वर्षांत दुसरी घटना

बीड / आष्टीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2004 मध्ये महावीर भगवंताच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

शहरातील पेठ गल्लीतील दिगंबर जैन मंदिरात बुधवारी पहाटे चोरांनी मंदिराचे कुलूप तोडून मंदिरातील २४ वे तीर्थंकर महावीर यांची एक मूर्ती, पार्श्वनाथ भगवानांची मूर्ती, मानसस्तंभ, दोन पद्मावती देवीच्या पितळी मूर्ती, महावीर भगवंताची स्फटिकाची मूर्ती अशा सहा मूर्ती रात्रीतून चोरी केल्या अाहेत. या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. मागील २० वर्षांत ही दुसरी मूर्ती चोरीची घटना समोर आली असून समाजातून तीव्र भावना व्यक्त होत आहेत.

आष्टी शहरातील पेठ गल्लीतील दिगंबर जैन मंदिरात ४२७ वर्षांपूर्वीची म्हणजेच शके १५१५ मधील २४ व्या तीर्थंकरांची पितळेची अर्धा किलो वजनाची एक फूट उंच मूर्ती तर दुसरी पाच इंच दोनशे ग्रॅम वजनाची पार्श्वनाथांची मूर्ती होती. तसेच सात किलो वजनाचा पितळी मानस्तंभ होता. सात व पाच इंचाच्या दोन पद्मावती देवीच्या मूर्ती तसेच महावीर भगवान यांची स्फटिकाची मूर्ती होती. लॉकडाऊनमुळे केवळ सकाळी सहा ते साडेनऊ या वेळेतच मंदिर पूजा व अभिषेकासाठी उघडले जात होते. त्यानंतर मंदिर बंद केले जात होते. १९ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी सहा वाजता मंदिराची नियमित साफसफाई करण्यासाठी बंडू जानापुरे गेले असता त्यांना मंदिराच्या मुख्य दाराचे कुलूप कोणीतरी तोडल्याचे दिसून आले. त्यांनी मंदिरात जाऊन गाभाऱ्यात पाहिले असता त्यांना मंदिरातील सर्व सहा मूर्ती चोरीस गेल्याचे दिसून आले. या प्रकरणी सुनील पंढरे यांनी आष्टी पोलिसांत तक्रार दिली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२० वर्षापूर्वीही मंदिरात झाली होती चोरी

आष्टी शहरातील पेठ गल्लीतील दिगंबर जैन मंदिराच्या शेजारीच जुने मंदिर होते. याच ठिकाणी २० वर्षांपूर्वी चोरांनी मंदिरातील सात मूर्ती व दान पेटीची चोरी केली होती. तेव्हा दान पेटीतील रक्कम चोरीला गेली होती. बुधवारच्या घटनेत मंदिरातील दानपेटी वाचली असली तरी मूर्ती चोरी गेल्याने भाविकांत खळबळ उडाली आहे. सदरील चोरीचा तपास लवकरात लवकर लावावा, अशी मागणी समाज बांधवांनी केली आहे.

२००४ मध्ये महावीर भगवंताच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

आष्टी येथील दिगंबर मंदिरातील मानस्तंभ व महावीर भगवंतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २००४ मध्ये करण्यात आली होती. आचार्य देवनंद महाराज यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आल्याचे खजीनदार सुभाष बोंदार्डे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...