आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लढा आरक्षणाचा:ही गरीब मराठ्यांची लढाई आहे, आरक्षण मिळाले नाही तर सरकारला रस्त्यावर आणू - आमदार विनायक मेटे

बीड14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या मोर्चात कोणी वाडा, गढी, राजवाडा असणारा आला नाही. ही गरीब मराठ्यांची लढाई आहे. ३० वर्षे न्याय मागितला, पण मिळाला नाही. यामुळे आता आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत आहे. आम्ही आज रस्त्यावर उतरलो, पण आरक्षण मिळाले नाही तर सत्ताधाऱ्यांनाही रस्त्यावर खेचून आणू, असा इशारा आमदार विनायक मेटे यांनी राज्य सरकारला दिला. बीडमध्ये मराठा समाज अारक्षणाच्या मागणीसाठी काेरोना काळातील पहिला धडक माेर्चा शनिवारी काढण्यात अाला. हा माेर्चा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथून सकाळी ११ वाजता निघाला. शहरातील प्रमुख मार्गावरून हा माेर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर सभेत रूपांतर झाले. या वेळी िशवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा अामदार विनायक मेटे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पाेकळे, साक्षाळपिंप्री येथे १०९ दिवस अांदाेलन करणारे मनाेज जरांगे, राजेंद्र घाग, बी. बी. जाधव, सुदर्शन धांडे, अनिल घुमरे अादी उपस्थित हाेते.

‘मराठा क्रांती संघर्ष मोर्चा: लढा आरक्षणाचा’ या माध्यमातून विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडे देण्यात अाले. मेटे म्हणाले की, मराठा समाजाला अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मिळालेले आरक्षण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयाने ५ मे २०२१ रोजी रद्द केले. त्यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे. येणाऱ्या काळात तीव्र अांदाेलनासाठी समाजबांधवांनी तयार राहावे, असेही अावाहन मेटे यांनी केले.

‘कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’
बीड | ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’, कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, एक मराठा लाख मराठा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गजर करत बेंबीच्या देठापासून घोषणा देणारे तरुण.. हे चित्र बीडच्या संघर्ष मोर्चातून शनिवारी पाहायला मिळाले. राज्यात यापूर्वी मराठा समाजाने ५८ मोर्चे आरक्षणप्रश्नी काढले, पण ते मूकमोर्चे होते. मात्र आरक्षण रद्द झाल्यानंतर बीडमध्ये निघालेला हा पहिला मोर्चा होता, ज्याने समाजाच्या भावनांना आवाज दिला.

मराठा अारक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आरक्षणाचा प्रश्न राज्यभर तापला आहे. समाजात अस्वस्थता होती. मात्र कोविडचा काळ असल्याने राज्यात कुठेही मोर्चा निघालेला नव्हता. बीडमध्ये शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटेंनी यासाठी पुढाकार घेतला, मराठा क्रांती माेर्चानेही याला पाठिंबा दिला आणि मोर्चाची तयारी झाली. या मोर्चालाही मराठा क्रांती संघर्ष मोर्चा लढा आरक्षणाचा असे नाव देण्यात आले. या मोर्चात हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवला. जिल्हा क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा निघालेल्या मोर्चात मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चाच्या अग्रभागी महिला होत्या.

या आहेत प्रमुख मागण्या

  • ५ मे २०२१ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करावी. मराठा समाजाला परिपूर्णपणाने आरक्षण मिळण्यासाठी कायदेशीररीत्या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार योग्य त्या प्रकारे प्रस्ताव तयार करून राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींकडे पाठवण्यात यावा.
  • मराठा समाजाला ओबीसी समाजबांधवांप्रमाणे आरक्षण वगळता इतर सर्व सोयी-सवलती देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने आर्थिक तरतुदीसह त्वरित घ्यावा.
  • मराठा समाजाच्या मुला-मुलींची शैक्षणिक फीसची शंभर टक्के प्रतिपूर्ती शासनाने करावी. शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात यावी. शैक्षणिक प्रवेश कसा देणार ते स्पष्ट करावे.
  • मराठा समाजाच्या ज्या मुला-मुलींनी ईएसबीसी-२०१४ व एसईबीसी २०१८-१९ आणि इतर विभागाच्या पद भरतीची सर्व प्रक्रिया ज्यांनी पूर्ण केली आहे त्या सर्वांना त्वरित नियुक्त्या देण्यात याव्यात.
  • सारथी संस्था पूर्ण ताकदीने कार्यान्वित करावी. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास भरीव आर्थिक तरतूद करून किमान रुपये ५० हजार थेट कर्ज देण्याचे अधिकार द्यावेत.
  • मराठा आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व नोकरी द्यावी.
  • मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्यावेत.

२७ जूनला मुंबईत होणार बाइक रॅली, सहभागी व्हा : राजेंद्र घाग
मराठा समाजाला अारक्षण हे महत्त्वाचे अाहे तरच येणाऱ्या अनेक पिढ्या सुखी हाेतील. अाजपर्यंत राज्यभरात जे माेर्चे निघाले त्यापेक्षाही व्यापक व अाक्रमक माेर्चांची गरज अाहे. २७ जूनला मुंबईत पुन्हा बाइक रॅली निघणार अाहे. त्यातही नागरिकांनी सहभागी व्हावे, असेही आवाहन मुंबई येथील राजेंद्र घाग यांनी केले अाहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाजाचा घात केला : मनाेज जरांगे
५ मे राेजी मराठा समाजाचा घात हा केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच केला अाहे, असा अाराेप साक्षाळपिंप्री येथे १०९ दिवसांचे अांदाेलन करणारे मनाेज जरांगे यांनी बीडमध्ये निघालेल्या माेर्चादरम्यान म्हटले. ते म्हणाले, अाता अारक्षण मिळवण्यासाठी राज्यभर निघणाऱ्या प्रत्येक माेर्चामध्ये मतभेद विसरून एकत्र येणे गरजेचे अाहे.

जिल्हाधिकाऱ्यांंना निवेदन
मराठा आरक्षण देण्यासह इतर अाठ प्रमुख मागण्यांचे निवेदन आमदार विनायक मेटे, नरेंद्र पाटील, राजेंद्र घाग, मनोज जरांगे पाटील, रमेश पोकळे, संगीता घुले, अ‍ॅड. मंगेश पोकळे, बी. बी. जाधव, सुदर्शन धांडे, स्वप्निल गलधर आदींच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना देण्यात आले.

धनगर, मुस्लिमांसह इतर समाजबांधवांचा पाठिंबा
मोर्चाच्या समारोपप्रसंगी धनगर, मुस्लिम, ओबीसी व मागासवर्गीय समाजबांधवांकडून पाठिंबा देण्यात आला. त्याबद्दल मराठा क्रांती मोर्चाचे मुंबईचे समन्वयक राजेंद्र घाग यांनी आभार व्यक्त केले.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त
मोर्चास जिल्हा प्रशासनाकडून परवानगी नाही. त्यामुळे मोर्चाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. तरीही मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी होतील याचा अंदाज बांधून जिल्हा पोलिस प्रशासनाने तगडा बंदोबस्त ठेवला होता. ८०० अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता. मोर्चात सहभागी होणाऱ्या प्रत्येकास मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

कोरोनाला घाबरत नाही, पावसाला काय घाबरणार?
मेटे यांचे भाषण सुरू असतानाच पाऊस सुरू झाला. त्यामुळे त्यांनी २०१९ च्या निवडणुकीतला इतिहास आहे. पाऊस येताच सरकार आलं, असा टोलाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांना लगावला. पावसात भिजल्याने आरक्षण मिळेल, अशी अपेक्षा, नाही मिळाल्यास सरकारला घालवून मिळवू. आणि आपण कोरोनाला घाबरत नाही, पावसाला काय घाबरणार, असे मेटे म्हणाले.

‘शिवक्रांती’चे गणेश बजगुुडे पोलिसांकडून स्थानबद्ध
बीडमध्ये निघणाऱ्या मराठा क्रांती संघर्ष मोर्चाला विरोध करणारे शिवक्रांती युवा परिषद या संघटनेचे अध्यक्ष गणेश बजगुडे यांना मोर्चाच्या आधी शनिवारी सकाळपासूनच पेठ बीड पोलिस ठाण्यात स्थानबद्ध केले गेले होते. मोर्चा संपेपर्यंत ते पोलिसांच्या नजरकैदेत होते. मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये निघणाऱ्या मोर्चाला कोरोना असल्यामुळे व इतर मतभेदांमुळे काही संघटनांनी विरोध केला होता. यामध्ये शिवक्रांती युवा परिषदेचे गणेश बजगुडे यांचाही समावेश होता. त्याांनी चिंतन बैठक घेऊन आपली भूमिका मांडली होती शिवाय, आमदार विनायक मेटेंच्या समर्थकांनी आपल्यावर हल्ला केल्याचा गंभीर आरोपही केला होता. मराठा आरक्षण मोर्चा सुरळीत पार पडावा, यासाठी पेठ बीड पोलिसांनी गणेश बजगुडे यांना सकाळपासूनच स्थानबद्ध केले होते. त्यामुळे हा मोर्चा बीड शहरामध्ये निर्विवाद पार पडल्याचे दिसून आले.

मराठा क्रांती माेर्चाने घेतलेली भूमिका मान्य राहील : रमेश पाेकळे
कै. अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला हक्काचे अारक्षण मिळण्यासाठी पहिला लढा सुरू केला. ताे अाजपर्यंत सुरू अाहे. मराठा समाजाचे अनेक नेते विविध पक्षांमध्ये अाहेत. त्यांनी मुलांच्या भविष्यासाठी पक्षांचे जाेडे साेडून समाजासाठी एकत्र येणे अावश्यक अाहे. पुढील काळातही माेर्चाची भूमिका मान्य राहील, असेही पाेकळे यांनी म्हटले.

हक्कांसाठीचा ‘संघर्ष’महिलांसह अाबालवृद्ध उतरले रस्त्यावर
हा प्रश्न अनेक पिढ्यांचा आणि वर्षानुवर्षांच्या हक्कांचा आहे. ही वेळ निर्णायक आहे, त्यामुळे कोरोनापेक्षाही आता न्याय आणि हक्क महत्त्वाचा आहे, असे सांगत तरुण, वृद्ध, महिला आणि लहान मुलेही शनिवारच्या संघर्ष मोर्चात सामील झाली. शनिवारच्या मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या तयारीसाठी आमदार विनायक मेटे, नरेंद्र पाटील, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वय आणि इतर मराठा संघटनांनी जिल्हाभर बैठका घेत वातावरणनिर्मिती केली होती. याचा परिणाम म्हणून कोरोनाचा काळ आणि वीकेंडचा कडक लॉकडाऊन असतानाही हजारोंच्या संख्येने मोर्चेकरी जमले होते. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातून मोर्चाला सुरुवात होणार असल्याने सकाळपासूनच इथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला गेला होता. सकाळी साडेनऊ वाजेपासूनच मोर्चेकरी क्रीडा संकुलाच्या मैदानात जमा होण्यास सुरुवात झाली होती. शहरातील प्रमुख मार्गांवरून भगवे झेंडे लावलेली वाहने मोर्चाच्या स्थळी येत होती. यामुळे शहरातही भगवे वातावरण तयार झाले होते.

बातम्या आणखी आहेत...