आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आध्यात्मिक:तुकाराम महाराजांच्या गाथेतील विचार समाजाच्या कल्याणासाठी; तुकोबांचे वंशज पुंडलिक महाराज देहूकर यांचे प्रतिपादन

केज2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

जगद‌्गुरू संत तुकाराम महाराजांचे विचार ज्यांनी समजून घेतले त्यांना खऱ्या अर्थाने जीवन कळाले. तुकाराम महाराजांच्या गाथेतील विचार समाजाच्या कल्याणासाठी आहेत, असे प्रतिपादन पुंडलिक महाराज देहूकर यांनी केले.

केज तालुक्यातील औरंगपूर येथील श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावनधामवर संत तुकाराम महाराजांच्या बीजेनिमित्त आयोजित सोहळ्यात कीर्तन मालेतील पुष्प गुंफताना संत तुकाराम महाराजांचे वंशज पुंडलिक महाराज देहूकर हे बोलत होते. पुढे बोलताना पुंडलिक महाराज म्हणाले की, श्रीक्षेत्र पावनधाम हे प्रति देहूच आहे. संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील विचार तळागळात पोहोचविण्याचे काम महादेव महाराज हे करत आहेत. शेतकरी व तरुणांना दिशा देण्याचे महान कार्य पावनधाम संस्थानच्या माध्यमातून होत असून ज्यांना कोणत्याच धामाला जाता येत नसेल त्यांनी पावनधामला येऊन पावन व्हावे.

असे आवाहन पुंडलिक महाराजांनी केले. पावनधाम येथे महादेव महाराज बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या संत तुकाराम महाराज बीज सप्ताह सोहळ्यात किर्तन, प्रवचन आणि पोवाड्याच्या माध्यमातून तुकोबांच्या गाथेतील विचार सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम होत आहे. बीजेच्या सप्ताह काळात समाजातील अनेक दानशूरांच्या मदतीने चोवीस तास अन्नदान होत आहे. तसेच राज्यभरातून किर्तनकार आपली किर्तन सेवा संत तुकाराम महाराजांच्या चरणी समर्पित करत आहेत. यावेळी महंत महादेव महाराज बोराडे, अमोल महाराज, अशोक महाराज, जनार्धन महाराज चलवाड, हनुमंत महाराज सिरसाट, सुर्यकांत नांदुरे, दिलीप शिंदे, भागवत शिंदे, सुदाम पाटील, पंडित सावंत, सौदागर कदम, फुलचंद काकडे, शंकर उबाळे, अरुण काळे, गणेश महाराज भगत, प्रशांत निगडे, सचिन पतंगे, उमेश करपे, केशव धनगरे, संतोष रोकडे, उत्तम पारेकर, गणपत पांचाळ, तुकाराम कापसे यांच्यासह भाविक उपस्थित होते.

नामसंकीर्तन खऱ्या अर्थाने सर्वात सोपी व श्रेष्ठ साधना परमेश्वराचे नामस्मरण करणे हे पुण्यकर्म आहे. त्यामुळे ईश्वराच्या साधनेसाठी फार काही न करता नामसंकीर्तन जरी केले तरी ही साधना ईश्वराला आवडते. संतांनीही नामसंकीर्तन ही सर्वात सोपी व श्रेष्ठ साधना असल्याचे सांगितलेले आहे. त्यामुळे व्यग्र दिनचर्येतून वेळ काढत नामसंकीर्तनावर भर द्यावा, असे आवाहन पुंडलिक महाराज देहूकर यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...