आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोपीनाथ मुंडेंचा स्मृतिदिन:राज्यभरातून हजारो समर्थक पांगरीत होणार दाखल; मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री येणार वैद्यनाथ मंदिरापर्यंतचा रस्ता जड

परळीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना संकटानंतर २ वर्षांनी परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर शुक्रवारी (३ जून) लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा आठवा स्मृतिदिन हा‘संघर्ष सन्मान दिन’म्हणून साजरा केला जात आहे. मुंडे यांच्या समाधी दर्शनासाठी बीड जिल्ह्यासह राज्यभरातून हजारो समर्थक येणार असल्याने व्यवस्थेची तयारी पूर्ण झाली आहे. गोपीनाथगडावर वाॅटरप्रूफ मंडपासह २० हजार लोकांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे दुपारी गोपीनाथगडावर उपस्थित राहून मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. दरम्यान, परळी शहरातील इटके कॉर्नर ते प्रभू वैद्यनाथ मंदिरापर्यंतचा रस्ता जड वाहनांसाठी शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत बंद केला आहे.

दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे स्मृतिदिन सार्वजनिकपणे साजरा करता आला नव्हता. यंदा गोपीनाथगडावर तब्बल १२० बाय २७० आकाराचा मंडप आणि ३० बाय ७० आकाराचे व्यासपीठ उभारले आहे. गोपीनाथगडावर नागरिकांसह खासदार, आजी-माजी आमदारांसह लोकप्रतिनिधींची मोठी उपस्थिती राहणार आहे. यामुळे गडासह परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

पंकजा मुंडेंनी केली व्यवस्थेची पाहणी : जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी बुधवारी (२ जून) गोपीनाथगडावर कार्यक्रमस्थळाची पाहणी करत परळी पोलिसांना आवश्यक त्या सूचना दिल्या. दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंनीही बुधवारी गोपीनाथगडावर जाऊन भाेजन व्यवस्थेसह कार्यक्रमस्थळाच्या व्यवस्थेची पाहणी करत आवश्यक त्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.

इटके कॉर्नर ते वैद्यनाथ मंदिरापर्यंत रस्ता जड वाहनांसाठी राहणार बंद गोपीनाथगडावर हजारोच्या संख्येने नागरिक येणार असल्याने परळी शहरातील रस्त्यावर जड वाहनांना वैद्यनाथ मंदिर परिसरात बंद घालण्यात आली आहे. शहरातील इटके कॉर्नर ते वैद्यनाथ मंदिर या रोडवर जड वाहनांना ३ जूनच्या रात्री १२ वाजेपर्यंत बंदी घातल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिली.

धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने सकाळी अकरा वाजता येणार
पालकमंत्री धनंजय मुंडे हे शुक्रवारी सकाळी ११ वाजता गोपीनाथगड येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने अभिवादनासाठी हेलिकॉप्टरने येणार आहेत. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने जामखेड (जि. नगर) येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडेंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित आदरांजली कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

गोपीनाथगडावर सकाळी १० ते १२:३० या वेळेत रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन होणार आहे. दुपारी ३.३० वाजता‘संघर्ष सन्मान दिन’कार्यक्रम होईल. यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात उद्योगपती पद्मश्री मिलिंद कांबळे, गोरक्षक पद्मश्री सय्यद शब्बीर, प्रीती पाटकर व इतर मान्यवरांचा गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान केला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...