आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिर:तीनशे वर्षांपूर्वीचे झुरळे गोपीनाथ भगवान विष्णूचे मंदिर

धंनजय आढाव | परळी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून परळीची देशात ओळख असून याच शहरातील जुन्या गावात तीनशे वर्षांचे झुरळे गोपीनाथ हे भगवान विष्णूच्या रूपातील मंदिर आहे. जमिनीपासून दहा फूट खोल असलेल्या या मंदिराच्या गाभाऱ्यात झुरळांच्या रूपाने गोपिका कायम वास्तव्यास असल्याने या मंदिराला झुरळे गोपीनाथ म्हणून ओळखले जाते. हर म्हणजे भगवान महादेव, तर हरी म्हणजे भगवान विष्णू होय. म्हणून परळी क्षेत्री हरिहर तीर्थ असून प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतल्यानंतर झुरळे गोपीनाथाचे दर्शन घेण्याची इथे अनेक वर्षांची परंपरा आहे. विशेष म्हणजे या मंदिरात गोकुळाष्टमी उत्साहात साजरी केली जाते.

परळी शहरातील गणेशपार भागातील भगवान विष्णू भक्त मोरेश्वर गणपतराव बडवे यांना घराशेजारी असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली मूर्ती असून या मूर्तीचा जीर्णोद्धार करा असा साक्षात्कार झाला होता. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी खोदकाम केल्यानंतर शाळिग्रामची चार फूट उंचीची सुंदर मूर्ती आढळली. मूर्ती जेथे आहे तेथेच जमिनीपासून दहा फूट खोल गाभारा तयार करून झुरळे गोपीनाथाचा जीर्णोद्धार केला. या मंदिराची व्यवस्था सध्या बडवे घराण्याकडे आहे. वैद्यनाथाचे दर्शन घेतल्यानंतर झुरळे गोपीनाथाचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात वर्षभर झुरळांचा वावर असतो. ही झुरळे म्हणजे कृष्णाच्या गोपिका असून मंदिरात दर्शन घेतेवेळी या झुरळांचा सहसा स्पर्श होत नाही. ज्यांच्या अंगावर ही झुरळे पडतात तो भाग्यवान समजला जातो.

गोकुळाष्टमी व अधिक मासात उत्सव
झुरळे गोपीनाथ मंदिरात भाविकांची विशेषतः महानुभावपंथीय भाविकांची नेहमी गर्दी असते. या मंदिरात गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अधिक मासामध्ये भगवान विष्णू आणि विष्णुपुरीचे दर्शन महत्त्वाचे मानले जाते. परळी व परिसरातील भाविक महिनाभर झुरळे गोपीनाथाचे दर्शन घेतात.

जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत मंदिर
परळी शहर हे ऐतिहासिक मंदिरांचे शहर आहे. शहरातील अनेक मंदिरांचा मागील काही वर्षांत जीर्णोद्धार झाला आहे. परंतु झुरळे गोपीनाथ मंदिर मात्र तीनशे वर्षांपूर्वीच्या गाभाऱ्यात असून त्यावर पत्र्याचे शेड आहे. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भाविकांनी पुढे येण्याची गरज आहे. -संजय बडवे, पुजारी, झुरळे गोपीनाथ मंदिर.

बातम्या आणखी आहेत...