आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:तीन दुचाकी चोर जेरबंद; चोरीच्या 11 दुचाकी जप्त

बीड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकी चोरांच्या टोळीतील तिघांना बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. सोमवारी सकाळी अंबाजोगाई, धारूर आणि तेलगाव परिसरात ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, अन्य चार चोरटे फरार असून पोलिस त्यांचाही शोध घेत आहेत. ताब्यात घेतलेल्या दुचाकी चोरांकडून चोरीच्या तब्बल ११ दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या.

ऋषिकेश मधुकर चव्हाण (२३, रा. नांदगाव, ता. अंबाजोगाई), अक्षय शिवाजी तिडके (१९, रा. भोगलवाडी, ता. धारूर) आणि आकाश प्रकाश चव्हाण (२०, रा. बडुळी तांडा, तेलगाव, ता. धारूर) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. गत काही महिन्यांपासून दुचाकी चोरीचे गुन्हे वाढलेले आहेत. या गुन्ह्यांच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपींचा शोध सुरू होता. दुचाकी चोरणाऱ्या टोळीतील काही सदस्य जिल्ह्यात फिरत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने अंबाजोगाई, धारूर व तेलगाव परिसरातून ३ चोरट्यांना ताब्यात घेतले. या चोरट्यांकडून चोरीच्या ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या.

अंबाजोगाई शहर ठाणे हद्दीतील ८ तसेच दिंद्रुड १ व मुंबई शहर ठाणे हद्दीतील १ अशा एकूण १० दुचाकी चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत. ही कारवाई सतीश वाघ, उपनिरीक्षक संजय तुपे, नसीर शेख, कैलास ठोंबरे, गणेश हांगे, गणेश मराडे, अशोक दुबाले, सतीश कातखडे, संपत तांदळे आदींनी केली.

बातम्या आणखी आहेत...