आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्ग समतोल:निसर्गाचा समतोल राखण्यासाठी; मस्साजोग येथे वृक्षप्रेमी देशमुखांनी जोपासले 33 प्रजातींचे 528 वृक्ष

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व ऑक्सिजन पार्क निर्माण व्हावा असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मस्साजोग ( ता. केज) येथील एका वृक्षप्रेमीने ३३ प्रकारच्या प्रजातीच्या ५२८ रोपांची लागवड केली. रोपांची काळजी घेत वाढवल्याने अनेक रोपांचे रूपांतर वृक्षांत झाले आहे. त्यांचा आदर्श घेऊन इतरांनी वृक्ष लागवड चळवळीस हातभार लागण्यास मदत होईल. धनंजय देशमुख असे या वृक्षप्रेमीचे नाव आहे.

निसर्गाचा समतोल राहावा म्हणून वृक्ष लागवडीच्या चळवळीला शासन स्तरावरून गती देण्यात आली आहे. दरवर्षी वृक्ष लागवडीवर भर दिला जातो. त्यामुळे वृक्ष लागवड केल्याचे फोटो पाहावयास मिळतात. मात्र त्याचे संगोपन केल्याचे फोटो मोजके येतात. संगोपनाकडे दुर्लक्ष होताना दिसून येते. मात्र काही वृक्षप्रेमी झाडावर जिवापाड प्रेम करून लागवड आणि संगोपनासाठी वेळ देताना दिसून येतात. मस्साजोग (ता. केज) येथील धनंजय देशमुख यांनी गतवर्षी सामाजिक वनीकरण कार्यालयातील वनपाल लक्ष्मण तागड यांच्याकडून ३३ प्रकारच्या प्रजातींचे पाचशेहून अधिक रोपे नेऊन २ गुंठे क्षेत्रावर लागवड केली.

घनवृक्ष लागवड करण्याचा मानस ठेवून त्यांनी २×२ फूट अंतरावर या रोपांची लागवड केली आणि पाण्याचे नियोजन करत वाढवलीत. विजेच्या भारनियमनाच्या काळात त्यांनी रात्रीच्या वेळी जाऊनसुद्धा टंचाईच्या काळात पाणी देत रोपे जगवली. आज साडेसात महिन्यांच्या काळात एक फुटांची रोपे ही ४ ते १५ फुटांपर्यंत वाढली आहेत. त्यामुळे हा परिसर निसर्गरम्य झाला असून त्यांचा उद्देश सफल झाला. त्यांनी आवळा, लिंब, बांबू, करंज, साग, आपटा, आंबा, सीताफळ, रिटा, श्यामल, बदाम, वेडी बाभळ, अर्जुन सादोडा, मोह, तुळस, अमलतास, कांचन, हादगा, सिसम, तुती यासह इतर प्रजातीच्या रोपांची लागवड केली. त्यांचा आदर्श घेऊन इतरांनी वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेतल्यास वृक्ष लागवडीच्या चळवळीस हातभार लागेल.

रोपे नेऊन तळमळीने वाढवल्याचे समाधान
उन्हाळ्याच्या दिवसात पाणी देऊन वाढवणे महत्त्वाचे असते. त्याच पद्धतीने मस्साजोग येथील धनंजय देशमुख यांनी ज्या तळमळीने रोपे मागून नेली. त्याच तळमळीने आज त्यांनी वाढवल्याचे समाधान आहे.
-लक्ष्मण तागड, वनपाल, सामाजिक वनीकरण कार्यालय, केज.

वर्षभरात एका व्यक्तीने किमान ५ झाडे लावावीत
एका वर्षात एका व्यक्तीने किमान ५ झाडे लावून जगवली पाहिजेत. तरच खऱ्या अर्थाने पर्यावरण दिवस साजरा करण्यात मजा आहे. पशू-पक्षी यांच्यासाठी पाणवठे, त्यांना खायला चारापाणी देणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.
- धनंजय देशमुख, वृक्षप्रेमी, मस्साजोग, ता. केज.

बातम्या आणखी आहेत...